Sonalika Joshi : हातात सिगारेट, छोटे केस... 'त्या' फोटोवर सोनालिका जोशीने अखेर मौन सोडलं; म्हणाली,
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या लोकप्रिय मालिकेतील माधवी भिडे हे पात्र प्रेक्षकांच्या मनात खोलवर रुजले आहे. या भूमिकेच्या माध्यमातून अभिनेत्री सोनालिका जोशी घराघरात पोहोचली. मात्र अलीकडेच सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका फोटोमुळे ती चर्चेचा आणि ट्रोलिंगचा विषय बनली आहे. एका फोटोशूटदरम्यान सोनालिकाने हातात सिगारेट घेतलेला फोटो प्रसिद्ध झाला आणि त्यानंतर तिला ‘चेन स्मोकर’ म्हणत अनेकांनी टीकेचा भडीमार केला. अखेर सोनालिकाने या संपूर्ण प्रकरणावर मौन सोडत स्पष्ट खुलासा केला आहे.
सोनालिकाचा सिगारेटसोबतचा फोटो पाहून काही सोशल मीडिया युजर्सनी तिला वैयक्तिक पातळीवर टीका करत तिच्या प्रतिमेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. माधवी भिडेसारख्या सोज्वळ, पारंपरिक व्यक्तिमत्त्व साकारणाऱ्या अभिनेत्रीचा असा अंदाज पाहून अनेकांना आश्चर्य वाटलं. मात्र सोनालिका जोशीने अत्यंत संयमितपणे या सर्व प्रकाराला उत्तर दिलं. ती म्हणाली, “तो फोटो केवळ एक स्टाइलिश पोझ होता. मी खरंच सिगारेट ओढत नव्हते. फोटोशूटच्या थीममध्ये हे दृश्य होतं, आणि मी एक अभिनेत्री म्हणून माझं काम केलं.
पण लोकांनी तो फोटो पाहिल्यावर मला ‘चेन स्मोकर’ ठरवून टाकलं. लोकांना जे पाहायचं असतं, तेच ते पाहतात. मी काहीही स्पष्ट केलं असतं तरी त्यांना त्यांच्या मनातील गोष्टच खरी वाटली असती. त्यामुळे मी शांत राहणं पसंत केलं.” तिच्यावर सोशल मीडियावरून झालेल्या या टीकेने सुरुवातीला मानसिक त्रास झाला असला, तरी तिच्या कुटुंबियांनी खंबीरपणे पाठिंबा दिला. सोनालिका म्हणते, “माझ्या घरी या गोष्टींचा काहीही परिणाम झाला नाही. माझं कुटुंब माझ्या पाठीशी होतं. त्यांना माहिती आहे की मी कोण आहे, आणि मी काय करते. त्यामुळे बाहेरच्यांची मतं मला फारशी महत्त्वाची वाटत नाहीत.”
2008 पासून 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेत काम करत असलेल्या सोनालिका जोशीने केवळ छोट्या पडद्यावरच नव्हे तर रंगभूमी आणि फॅशन डिझायनिंगच्या क्षेत्रातही आपली ओळख निर्माण केली आहे. अभिनयासोबतच ती वैयक्तिक आयुष्य आणि करिअर यांचा समतोल राखत आहे. अशा प्रकारे, एका साध्या फोटोशूटच्या माध्यमातून उठलेलं गैरसमजाचं वादळ, सोनालिकाने संयम आणि समजूतदारपणाने सामोरं जाऊन पार केलं आहे. सोशल मीडियावर ट्रोलिंगला सामोरं जात असतानाही, स्वतःवरचा विश्वास टिकवून, एक अभिनेत्री म्हणून तिची भूमिका निभावणं, हेच तिच्या व्यक्तिमत्त्वाचं खरे सौंदर्य अधोरेखित करतं.