Marathi Actor Sachin Chandwad Death : नुकतच चित्रपटाचे मोशन पोस्टर शेअर केला अन् मराठमोळ्या अभिनेत्याने उचलले टोकाचे पाऊल

Marathi Actor Sachin Chandwad Death : नुकतच चित्रपटाचे मोशन पोस्टर शेअर केला अन् मराठमोळ्या अभिनेत्याने उचलले टोकाचे पाऊल

मनोरंजन क्षेत्रातून अत्यंत दु:खद वार्ता समोर आली आहे. मराठी सिनेअभिनेता सचिन चांदवडे याने अवघ्या २५व्या वर्षी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे.
Published by :
Prachi Nate
Published on

मनोरंजन क्षेत्रातून अत्यंत दु:खद वार्ता समोर आली आहे. मराठी सिनेअभिनेता सचिन चांदवडे याने अवघ्या २५व्या वर्षी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली असून, या घटनेमुळे मराठी चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. सचिनने असे टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण अद्याप समोर आलेले नाही.

सचिनचा आगामी मराठी चित्रपट ‘असुरवण’ लवकरच प्रदर्शित होणार होता. सिनेमाचे प्रमोशनही सुरू झाले होते. काही दिवसांपूर्वीच त्याने या चित्रपटाचे मोशन पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले होते. मात्र, प्रदर्शनाच्या उंबरठ्यावर असतानाच त्याच्या निधनाने चित्रपटाशी संबंधित सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.

सचिन चांदवडे हा जळगाव जिल्ह्यातील परळा येथील रहिवासी होता. मिळालेल्या माहितीनुसार, 23 ऑक्टोबर रोजी त्याने राहत्या घरात गळफास घेतला. कुटुंबीयांनी तत्काळ रुग्णालयात दाखल केल्यानंतर पुढील उपचारासाठी त्याला धुळे येथे हलवण्यात आले; पण 24 ऑक्टोबर रोजी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी सचिन सॉफ्टवेअर इंजिनीअर म्हणून पुण्यातील आयटी पार्कमध्ये कार्यरत होता. नंतर त्याने अभिनयात करिअर करण्याचा निर्णय घेतला. नेटफ्लिक्सवरील लोकप्रिय क्राईम ड्रामा ‘जम्तारा 2’ या मालिकेत काम करताना त्याला विशेष ओळख मिळाली होती.

‘असुरवण’ या चित्रपटात सचिनसोबत पूजा मोइली आणि अनुज ठाकरे मुख्य भूमिकेत आहेत. रामचंद्र अंबट दिग्दर्शित हा प्रकल्प त्याच्या कारकिर्दीत महत्त्वाचा टप्पा ठरणार होता. पण त्याच्या अकस्मात जाण्याने हा उत्साह विरुन गेला आहे.

या प्रकरणी परळा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून अधिक तपास सुरू आहे. कुटुंबीय आणि चित्रपटाच्या निर्मात्यांकडून अजून अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. सचिनच्या जन्मगावात आणि चाहत्यांमध्ये शोकाची भावना असून, सोशल मीडियावर श्रद्धांजलीचा ओघ दिसून येत आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com