‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटाचा दमदार टीझर रिलीज

‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटाचा दमदार टीझर रिलीज

शाहीर साबळे यांच्या भूमिकेत अंकुश चौधरी दिसत आहे.
Published on

शाहीर कृष्णराव गणपतराव साबळे म्हणजेच महाराष्ट्राचे लाडके शाहीर साबळे. शाहीर साबळे यांच्या गाण्यांवर महाराष्ट्रानेच नाही तर जगाने प्रेम केलं. त्यांचं महाराष्ट्र गीत असो, खंडोबाचा जागर किंवा कोळी गीत.. प्रत्येकच गाणं हे माणसाच्या काळजात हात घालणारं. शाहीर साबळे यांनी महाराष्ट्राला दिलेली 'महाराष्ट्राची लोकधारा' आजही अनेकांच्या स्मरणात आहे. शाहीर साबळे यांच्या पश्चात हा वारसा त्यांचा नातू म्हणजेच दिग्दर्शक केदार शिंदे पुढे नेत असून त्यांच्या जीवनावर आधारित महाराष्ट्र शाहीर या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे.

शाहीर साबळे यांच्या भूमिकेत अंकुश चौधरी दिसत आहे. या टीझरमध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, यशवंतराव चव्हाण, साने गुरुजी, लता मंगेशकर यांची झलकही पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर या टीझरमधून शाहीर साबळे यांनी केलेलं कामही उलगडत जातं. अंकुश चौधरीसोबत या चित्रपटात सना शिंदे, अभिनेत्री अश्विनी महांगडे, मृण्मयी देशपांडे भूमिका साकारत आहे. तर या चित्रपटाच्या संगीताची धुरा अजय-अतुल यांनी सांभाळली आहे.

शाहीर साबळे यांच्या जीवनकार्याचा वेध 'महाराष्ट्र शाहीर' या चित्रपटातून घेतला गेला आहे. अनेक नाटकं, टीव्ही मालिका केलेल्या ज्येष्ठ लेखिका आणि दिग्दर्शिका प्रतिमा कुलकर्णी 'महाराष्ट्र शाहीर' चित्रपटाचं लेखन केले आहे. तर शाहिरांचेच नातू आणि दिग्दर्शक केदार शिंदे हा चित्रपट दिग्दर्शित केले आहेत. नातवानंच आपल्या आजोबांवर चित्रपट करण्याचा दुर्मीळ योग या चित्रपटामुळे जुळून आला आहे. २८ एप्रिल २०२३ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होईल.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com