Nora Fatehi In Ratnagiri: साडीचा मान तर झिंगाटवर नोराचा डान्स, टीममधील सदस्याच्या लग्नाला नोराने गाठली थेट रत्नागिरी
अभिनेत्री नोरा फतेहीने आपल्या मेहनतीने बॉलिवूडमध्ये एक खास स्थान निर्माण केलं आहे. डान्सर म्हणून बॉलिवूडमध्ये काम सुरू करणाऱ्या नोराने तिच्या डान्सने सगळ्यांनाच वेडं केलं. सध्याच्या घडीला ती हिंदी सिनेसृष्टीतील सर्वोत्कृष्ट डान्सर्सपैकी एक आहे. नोरा तिच्या कामाबरोबरच तिच्या नम्रतेने सगळ्यांनाच आपलंस करते. याचाच प्रत्यय कोकणातील लोकांना आला आहे.
त्याचं झालं असं की, आपल्या टीम मेंबरच्या लग्नासाठी नोराने थेट कोकण गाठलं आहे. तिने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात तिने तिच्या प्रवासाबाबत सगळी माहिती दिली आहे. टीममधील सदस्य अनुपच्या लग्नाला नोराने हजेरी लावली. यासाठी तिने ट्रेनने प्रवास केला. दादर स्थानकाहून सकाळी सहाच्या सुमारास तिने ट्रेन प्रवास सुरू केला. टीम मेंबरसाठी हे एक गोड सरप्राईज होतं.चेहऱ्यावर मास्क लावून नोराने ट्रेनचा प्रवास केला. तिने संपूर्ण प्रवासाचा आणि हळदीचा खास व्हिडिओ शेअर केला आहे.
या पोस्टच्या कॅप्शनमध्ये नोराने लिहिलं आहे, "हा माझा रत्नागिरीतील लग्नाच्या हळदी समारंभासाठीचा छोटा व्लॉग ! @anups_ च्या समारंभात सहभागी होण्यासाठी आम्ही ट्रेन पकडली! इतका सुंदर अनुभव होता तो! ज्यांना माहित नाही त्यांच्यासाठी, अनुप माझ्या आयुष्यात आणि टीममध्ये 8 वर्षांपासून आहे! तो 2017 पासून माझा प्रवास कॅमेऱ्याच्य मागून कॅप्चर करत आहे, आता तो कॅमेरासमोर आहे. मी तुझ्यासाठी सदैव कृतज्ञ आहे. आम्ही तुझ्यावर प्रेम करतो. अनूप तुला लग्नाच्या शुभेच्छा!"
कोण आहे अनूप सुर्वे
अनुप सुर्वे हा नोराच्या टीममधील एक सदस्य आहे. तो गेल्या आठ वर्षापासून नोरासोबत काम करतो आहे. त्याच्या इन्स्टाग्राम बायोवरून अनुप हा क्रिएटिव्ह डायरेक्टर, फॅशन आणि व्यावसायिक फोटोग्राफर, व्हिडिओग्राफर आहे असं समजत आहे.