Nushrratt Bharucchaला लागलंय वेड, पुरुषाने कंडोम खरेदी केले नाही तर...
आपल्या देशात ‘कंडोम’ हा शब्द जोरात उच्चारण्यालासुद्धा पाप समजलं जातं आणि या परिस्थितीत नुसरत भरुचा (Nushrratt Bharuccha) म्हणते की, जर पुरुषाने कंडोम खरेदी केले नाही तर महिलांनी आपल्याजवळ सॅनिटरी नॅपकिन बाळगल्याप्रमाणे कंडोम (Condom) बाळगायला हवे. पण मेडिकलमध्ये जाऊन कचरत कचरत सॅनिटरी पॅड (Sanitary pad) खरेदी करणाऱ्या महिला कंडोम कशा खरेदी करतील? लोक काय म्हणतील?
नुसरत भरुचा सध्या तिच्या ‘जनहित में जारी’ (Janhit Mein Jaari) या चित्रपटाच्या माध्यमातून स्त्रियांनी कंडोम खरेदी करण्याचा हा मुद्दा मांडू पाहतआहेत. चित्रपटाच्या प्रसारासाठी तिने देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी कंडोम देखील वाटले आणि असं करून आपल्या देशात सॅनिटरी पॅड आणि कंडोमच्या समाजमान्यतेवर नुसरत भरुचा यांनी आपल्या आगळ्या वेगळ्या स्टाईलने वास्तव भाष्य करण्यास सुरुवात केली. आपल्या देशात एखाद्या मुलीने फक्त कंडोम खरेदी केले तरी तिच्या चारित्र्यावर संशय घेतला जातो आणि असं असतांना जर एखाद्या मुलीने दुकानात जाऊन कंडोम खरेदी केले तर तिचे काय हाल होतील याविषयी कल्पनाच न केलेली बरी.
“कंडोम…. अरे बापरे! तुम्ही हे काय बोललात? जरा सावकाश बोला कुणीतरी ऐकेल की. पॅड? या काही चार चौघात बोलण्याच्या गोष्टी आहेत का?” पॅड आणि कंडोम याच शब्दांना आपल्या देशातील लोक एवढे घाबरतात तर ‘सेक्स’ या शब्दाविषयी तर कुणी बोलूच शकत नाही. हो म्हणजे कधी कधी सेक्स सोबत एज्युकेशन हा शब्द जोडून लैंगिक शिक्षण किंवा सेक्स एज्युकेशन असं काहीबाही बोलून वेळ मारून नेण्याची पद्धत आपल्याकडे वापरली जाते. शिक्षण हा शब्द सेक्ससोबत जोडला की मग कुठे याबाबतीत लोकांची थोडीशी लाज कमी होईल आणि किमान लोक यावर मोकळेपणाने बोलू शकतील. पण काहीही केलं तरी आजही भारतात ‘सेक्स’, ‘कंडोम’ आणि ‘पॅड’ याविषयी मोकळेपणाने बोललं जात नाही.
या चित्रपटात नुसरतने कंडोम विकणाऱ्या एका महिलेचे पात्र पडद्यावर साकारले आहे. ती ज्या कंपनीमध्ये काम करते तिथे तिला सोडून एकही महिला काम करत नाही. यामुळे तिथे काम करताना तिला अनेक अडचणी येतात, लोक तिची थट्टा करतात कारण लोकांना वाटत की कंडोम विकण्याचे काम हे बदनामी ओढवून घेणारे काम आहे. कंडोम विकणाऱ्या नुसरतकडे संशयाने पाहिलं जात तिच्या चारित्र्याला वाईट ठरवलं जातं.
कंडोम विकणाऱ्या या महिलेला चरित्रहीन समजलं जातं जसे की ती कंडोम नाही तर एखादा अंमली पदार्थ किंवा बेकायदेशीर काहीतरी विकत असेल. जिथे लोक पॅडबद्दल उघडपणे बोलायला घाबरतात तिथे बिनधास्त कंडोम बद्दल बोलणाऱ्या या पोरीला तर निर्लज्जच समजले जाईल ना पण ही मुलगी चुकीचं असं तर नक्कीच काही बोलत नाही. सगळ्या माणसांच्या आयुष्यात सेक्सला महत्व तर आहे पण त्याबद्दल बोलण्याला मात्र आपल्याकडे अजिबात परवानगी नाही.
नुसरत भरुचाने केलेल्या या भूमिकेवर चित्रपटातील पात्रांनीच नाही तर चित्रपटाच्या बाहेर असणाऱ्या खऱ्या खुऱ्या माणसांनी देखील टीका केली, नुसरत हा समाज माध्यमांवर आता चेष्टेचा विषय बनली आहे. या चित्रपटासाठी नुसरत भारताच्या वेगवेगळ्या शहरात फिरत असतांना तिला प्रचंड ट्रोल केलं गेलं. या सगळ्या ट्रोलिंग आणि हेटाळणीचा मात्र नुसरतवर काहीही परिणाम झालेला नाही कारण ती म्हणते की कंडोम विषयी समाजात जागृती निर्माण करण्यात काहीही चुकीचे नाही.
आजही ‘कंडोम’ हा शब्द कानावर पडला की लोकांना लगेच ‘सेक्स’ आठवायला लागतो. कंडोम म्हणजे सेक्स आणि सेक्स म्हणजे कंडोम अशीच धारणा लोकांमध्ये तयार झाली आहे पण महिलांसाठी कंडोमचे महत्व याहीपेक्षा कितीतरी जास्त आहे याची खचितच कुणाला कल्पना असावी. नको असलेली गर्भधारणा टाळण्यासाठी कंडोम हा सगळ्यात खात्रीशीर आणि कुठलीही वेदना न देणारा सुखकर उपाय असल्याने कंडोमचे महत्व पुरुषांपेक्षाही महिलांसाठी कितीतरी अधिक आहे याचबरोबर अनेक इन्फेक्शन्स आणि रोगांपासूनही कंडोम तुमचा नेहमी बचाव करतं ही गोष्टही लक्षात घेणे महत्वाचे आहे.
नुसरत म्हणते की “कंडोम कडे फक्त सेक्स करण्यासाठी लागणारं एक साधन म्हणून पाहण्यापेक्षा आपल्या सुरक्षिततेचा उपाय म्हणून पाहणं अत्यंत महत्वाचं आहे. पुरुषांनी कंडोम वापरलं नाही तर आता महिलांसाठीसुद्धा कंडोम बाजारात उपलब्ध झाले आहेत. महिलांनी आपल्या सुरक्षेसाठी हे कंडोम तरी आपल्याजवळ ठेवायलाच हवेत.”
संयुक्त राष्ट्र संघाच्या लोकसंख्या कोशाच्या (UNFPA) च्या जागतिक लोकसंख्येच्या संदर्भातील एका सर्वेक्षणात एक धक्कादायक बाब समोर आली आहे 2022 च्या सर्वेक्षणानुसार भारतात एका दिवसाला गर्भपातामुळे तब्बल 8 महिलांचा मृत्यू होत असल्याची माहिती मिळाली आहे. 67% गर्भपातामध्ये महिलेच्या जीवाला धोका निर्माण होतो. अनेक कुटुंबांमध्ये महिलेच्या आरोग्याविषयी कमालीची अनास्था पुरुषांमध्ये दिसून येते याचबरोबर लग्नाच्या आधी जर एखाद्या महिलेला गर्भधारणा झाली तर कुटुंब आणि समाजाच्या भीतीमुळे लपूनछपून गर्भपात करणाऱ्या मुलींची संख्या सुद्धा खूप जास्त आहे. फक्त सेक्स करताना एक कंडोम वापरल्याने या सगळ्या संकटांचा महिलांना सामना करावा लागणार नाही एवढी साधी सोप्पी गोष्ट आहे ही जिचे महत्व समजावण्याचे काम नुसरतचा हा चित्रपट करतो आहे.
कंडोम या शब्दाचा उच्चार करायला आपल्या समाजातील सुशिक्षित लोकसुद्धा धजावत नाहीत ही वस्तुस्थिती आहे. एखाद्या मुलीला जेंव्हा पहिल्यांदा पाळी येते तेंव्हा साहजिकच तिला याबाबत काही माहिती नसतं पण ‘पाळी’ ही गोष्ट लपवून ठेवायची असते, तिच्याविषयी कुठेही बोलायचं नसतं असं जेंव्हा त्या मुलीच्या मनावर तिच्या कुटुंबातील महिलांकडून बिंबवलं जातं आणि तोच समज घेऊन ती मुलगी मोठी होते आणि जगत असते. पाळीच्या बाबतीत मुलांना तर काहीही सांगितलं जात नाही. एवढंच काय तर महिला मासिक पाळीबद्दल आपल्या भावाला किंवा वडिलांनासुद्धा मोकळेपणाने बोलू शकत नाहीत.
अशावेळी एक महिला पॅड खरेदी करायला दुकानात जाते तेंव्हा आधी ती आधी त्या दुकानातून इतर ग्राहक निघून जाण्याची वाट बघते आणि नंतर हळूच जाऊन दुकानदाराला ‘पॅड’ मागते. पॅड हा शब्द कानावर पडताच तो दुकानदार आधी तिच्याकडे पाहतो आणि मग एखाद्या जुन्या कागदात गुंडाळून एका काळ्या पिशवीत पॅडचा पुडा तिच्याकडे सुपूर्द करतो जसे की हा दुकानदार पॅड नाही तर बेकायदेशीर असलेला एखादा अंमली पदार्थच त्या मुलीला देतोय आणि जर ते इतर कुणाला दिसलं तर त्याच्या इज्जतीचा जणू काही कचराच होईल.
अलीकडे परिस्थिती थोडीफार बदलत आहे, मुली आणि महिला याबाबत थोड्याशा जागरूक होत आहेत. आजकाल मुलींच्या हातात यूट्यूब आहे, फोन आहे पण काही वर्षांपूर्वी मात्र परिस्थिती अत्यंत भीषण होती. आजही वयस्कर महिला याबाबत नीट बोलू शकत नाहीत ही परिस्थिती आहे.
समाजात अनेक पुरुषांना कंडोम वापरण्यावर अजिबात विश्वास नाहीये कंडोम वापरला तर त्यांची अब्रू धोक्यात येईल अशी धारणा पुरुषांच्या मनात असते. अनेकांना कंडोम वापरणे म्हणजे पुरुष असण्याचा अपमानसुद्धा वाटतो आणि अशा परिस्थितीत जर पत्नीने कंडोम बद्दल काही विचारले तर ‘तू शांत रहा, काही नाही होणार’ असे तिला सांगितले जाते पण अनेक महिलांना याचा परिणाम म्हणून नाईलाजाने जीव धोक्यात घालून गर्भपात करून घ्यावा लागतो.
वास्तविक पाहायला गेलं तर पुरुषांपेक्षा महिलांना कंडोमची गरज जास्त आहे. अनेक पुरुषांना असं वाटत की कंडोम वापरल्याने त्यांना हवे तेवढे लैंगिक सुख मिळणार नाही आणि केवळ यासाठी ते आपल्या बायकांना गर्भनिरोधक गोळ्या घेण्यास भाग पडतात पण या सगळ्या गोळ्या आणि औषधांचा एका महिलेच्या शरीरावर खूप वाईट परिणाम होऊ शकतो. त्यामुळे ‘आज ना उद्या तिला मरायचेच आहे त्यामुळे आज मेली तर काय हरकत आहे… गर्भपात करून त्यांची तब्येत बिघडली, त्यांचा अगदी जीव गेला तरी हरकत नाही पण आम्ही कंडोम कशासाठी खरेदी करायचा?’