Pankaj Dheer Death : महाभारतातील 'कर्ण' पंकज धीर यांचे निधन; कॅन्सरशी झुंज अपयशी
टीव्ही इंडस्ट्रीमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. बीआर चोप्रा यांच्या महाभारतात कर्णाची भूमिका साकारणारे अभिनेते पंकज धीर यांचे निधन झाले आहे. आज 15 सप्टेंबर बुधवारी सकाळी 11.30 च्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मिळालेल्या माहितीनुसार, वयाच्या 68 व्या वर्षी ते कॅन्सरशी झुंज देत होते. यापूर्वीही त्यांनी कॅन्सरवर यशस्वीरित्या मात केली होती, मात्र यावेळेस ते कॅन्सरशी झुंज देण्यात अपयशी ठरले.
यानंतर मुंबईतील विलेपार्ले इथल्या स्मशानभूमीत संध्याकाळी 4.30 वाजताच्या सुमारास त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. पंकज धीर यांनी आजवर अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्यांनी सुप्रसिद्ध मालिका ‘महाभारत’मध्ये कर्णाचा भूमिका साकारली होती. त्याचसोबत ‘चंद्रकांता’मधील त्यांच्या शिवदत्तच्या भूमिकेने त्यांना विशेष लोकप्रियता मिळवून दिली.
‘बढो बहू’, ‘युग’, ‘द ग्रेट मराठा’, ‘अजूनी’ यांसारख्या मालिकांमध्ये त्यांनी काम केलं. तसेच ‘सोल्जर’, ‘तुमको ना भूल पाएंगे’, ‘रिश्ते’, ‘अंदाज’, ‘सडक’ आणि ‘बादशाह’सारख्या चित्रपटांमध्येही त्यांनी आपली छाप पाडली. पंकज धीर CINTAAचे माजी जनरल सेक्रेटरी होते. त्यामुळे त्यांच्या निधनावर CINTAA नेही शोक व्यक्त केला आहे. पंकज यांच्या निधनाच्या वृत्ताने कलाविश्वावर शोककळा पसरली आहे.