'संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील' या चित्रपटातील तिसरे गाणे प्रदर्शित

'संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील' या चित्रपटातील तिसरे गाणे प्रदर्शित

संपूर्ण राज्यात बहुचर्चित असणारा चित्रपट संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील येत्या 26 एप्रिलला राज्यभरातील सर्व सिनेमा गृहांमध्ये प्रदर्शित होत आहे.
Published by :
Dhanshree Shintre

सचिन बडे | छत्रपती संभाजीनगर: संपूर्ण राज्यात बहुचर्चित असणारा चित्रपट संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील येत्या 26 एप्रिलला राज्यभरातील सर्व सिनेमा गृहांमध्ये प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाने प्रदर्शित होण्याआधीच राज्यात धुमाकूळ माजवला आहे. राज्यात बहुचर्चित असणारे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनावर हा चित्रपट आधारित असल्याने प्रेक्षकांनी हा चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच डोक्यावर घेतला आहे. अशातच या चित्रपटाचे तिसरे गाणे आज जी म्युझिक मराठी या प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे.

संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील या चित्रपटातील 'जय देव जय देव जय शिवराया' हे गाणे गायक आदर्श शिंदे यांनी गायले असून संगीतकार चिनार महेश तर गीतकार मंगेश कांगणे आहेत. संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित असल्याने हा चित्रपट बनवण्याचा निर्णय लेखक तथा निर्माते गोवर्धन दोलताडे यांनी घेतला आणि या चित्रपटाचे दिग्दर्शन शिवाजी दोलताडे यांनी केले आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेमध्ये रोहन पाटील असणार आहेत. 'जय देव जय देव जय शिवराया' हे गाणे शिवभक्ती आणि शिवशक्ती यांचा दर्शवतो.

देशात सर्वाधिक जास्त चर्चेत असणारे मनोज जरांगे यांच्या उपोषणावर हा चित्रपट आधारित असून आतापर्यंत दोन गाणे प्रदर्शित झाले आहेत, तर हे तिसरे गाणे प्रदर्शित करण्यात आले आहे. या चित्रपटामध्ये सिनेसृष्टीतील दिग्गज कलाकारांनी विविध भूमिका साकारल्या आहेत. ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी, अभिनेते संदीप पाठक, सागर कारंडे, फॅन्ड्री चित्रपटातील मुख्य कलाकार असणारे सोमनाथ अवघडे, सैराट चित्रपटातील सल्याची भूमिका साकारलेला अरबाज, जय मल्हार मालिकेतील अभिनेत्री सुरभी हांडे, नाळ चित्रपटातील दोन्हीही बालकलाकार या चित्रपटात असणार आहेत. एकंदरीत राज्यात गाजलेल्या मोठमोठ्या चित्रपटातील दिग्गज कलाकार या चित्रपटात काम करत आहेत.

या चित्रपटाची टीम राज्यभर प्रदर्शनाआधी प्रेक्षकांच्या भेटीला जाताना या चित्रपटाला आणि गाण्यांना भरभरून प्रतिसाद मिळत आहे. यामुळे हा चित्रपट राज्यात रेकॉर्ड ब्रेक करेल असा विश्वास चाहत्यांनी व्यक्त केला आहे. या चित्रपटाच्या आतापर्यंतच्या गाण्यांनी युट्यूब वर असणारा ट्रेंड कायम ठेवला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com