Sara Tendulkar : सचिनच्या लेकीने देशचं नाव उंचावल; तब्बल 13 कोटी डॉलर्सच्या प्रोजेक्टची ब्रँड अँबेसिडर बनली
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांची कन्या सारा तेंडुलकर हिची एक नवी ओळख आता समोर आली आहे. क्रिकेट विश्वात वडिलांनी निर्माण केलेल्या लौकिकानंतर, सारा स्वतःच्या दमावर आता आंतरराष्ट्रीय पातळीवर झळकू लागली आहे. ऑस्ट्रेलियन सरकारच्या 13 कोटी डॉलर्स खर्चाच्या विशेष पर्यटन मोहिमेसाठी सारा तेंडुलकर हिला भारतातील 'ब्रँड अॅम्बेसडर' म्हणून नियुक्त करण्यात आलं आहे.
ऑस्ट्रेलियन सरकार लवकरच आंतरराष्ट्रीय पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी ‘Come and Say G’day’ नावाची भव्य पर्यटन मोहीम सुरू करत आहे. या मोहिमेअंतर्गत, विविध देशांमध्ये पर्यटनाचा प्रचार करण्यासाठी स्थानिक स्तरावर लोकप्रिय आणि विश्वासार्ह व्यक्तींना ‘ब्रँड अॅम्बेसडर’ म्हणून जोडले जात आहे. भारतामधील चेहरा म्हणून सारा तेंडुलकरची निवड झाल्यामुळे तिला आता देशाबाहेरही सुपरस्टार म्हणून मान्यता मिळाल्याचं स्पष्ट होत आहे. ही मोहीम जवळपास 13 कोटी डॉलर्स (हवामान अंदाजे 1080 कोटी रुपये) इतक्या मोठ्या खर्चात राबवण्यात येणार असून, त्याद्वारे ऑस्ट्रेलियातील सुट्ट्यांचा अनुभव घेण्यासाठी आंतरराष्ट्रीय पर्यटकांना आकर्षित करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.
या मोहिमेची सुरुवात 7 ऑगस्टपासून चीनमध्ये होणार आहे. त्यानंतर ती भारत, अमेरिका, ब्रिटन आणि इतर प्रमुख देशांमध्ये राबवण्यात येणार आहे. ही मोहिम 2022 मध्ये प्रथमच सुरू करण्यात आली होती, आणि आता तिची ही दुसरी आवृत्ती अधिक व्यापक स्वरूपात सादर केली जात आहे. ऑस्ट्रेलिया सरकारने या उपक्रमासाठी 2022 पासून एकूण 25 कोटी डॉलर्स गुंतवले असून, येत्या दोन वर्षांत ही मोहीम जागतिक स्तरावर चालू राहणार आहे.
भारतामध्ये सारा तेंडुलकर मोहिमेचा चेहरा असणार असली, तरी इतर देशांमध्ये स्थानिक प्रसिद्ध व्यक्तींना प्रतिनिधी म्हणून निवडण्यात आले आहे. ज्यात अमेरिकेतून रॉबर्ट इर्विन, सुप्रसिद्ध वाइल्डलाइफ कन्झर्वेशनिस्ट स्टीव्ह इर्विन यांचा मुलगा, त्याचसोबत ब्रिटनमध्ये निजेला लॉसन, ख्यातनाम खाद्य लेखिका आणि टीव्ही शेफ. तसेच चीनमध्ये योश हू, सुप्रसिद्ध अभिनेता आणि जपानमध्ये अबेरेरु-कुन, लोकप्रिय विनोदी कलाकार आणि मीडिया व्यक्तिमत्त्व.
सारा तेंडुलकरची आंतरराष्ट्रीय झळाळी
सारा तेंडुलकर ही आजवर सोशल मीडियावर आणि फॅशन ब्रँड्सच्या मोहिमांमध्ये अॅक्टिव्ह होती. तिची प्रसिद्धी ही एक सेलिब्रिटी मुलगी म्हणून मर्यादित राहिली होती, मात्र आता ती आंतरराष्ट्रीय स्तरावरील सरकारी मोहिमेची ब्रँड अॅम्बेसडर झाल्याने तिच्या करिअरमध्ये मोठी झेप घेतल्याचं दिसत आहे. विशेषतः भारतात जेव्हा ही मोहीम अधिकृतपणे सुरू होईल, तेव्हा सारा तेंडुलकर ऑस्ट्रेलियन पर्यटन मोहिमेचं प्रतिनिधित्व करणारी प्रमुख भारतीय चेहरा असणार आहे.