आता होणार पुन्हा झिम्मा, 'झिम्मा २'चं टायटल साँग प्रदर्शित

आता होणार पुन्हा झिम्मा, 'झिम्मा २'चं टायटल साँग प्रदर्शित

बायकांच्या मनात काय सुरु असते, याचे उत्तर मिळणे जरा अशक्यच आहे.
Published by  :
Siddhi Naringrekar

बायकांच्या मनात काय सुरु असते, याचे उत्तर मिळणे जरा अशक्यच आहे. त्या कधी कशा व्यक्त होतील याचा काही नेम नसतो. अशाच विविध तऱ्हा असणाऱ्या, व्यक्तिमत्वाच्या बायका जेव्हा एकत्र येतात तेव्हा मात्र धम्माल होते. अशीच धमाल आता 'झिम्मा २'मध्ये ही पाहायला मिळणार आहे. हेमंत ढोमे दिग्दर्शित 'झिम्मा २'च्या ट्रेलरची सर्वत्र जोरदार चर्चा सुरु असतानाच आता या चित्रपटातील उत्साहाने भरलेले टायटल सॉन्ग प्रदर्शित झाले आहे. या टायटल सॉन्गची धमालही चित्रपटाच्या कथेप्रमाणे डबल धमाकेदार झाली आहे. इंदूच्या (सुहास जोशी)च्या ७५ व्या वाढदिवसानिमित्ताने परदेशात रियुनियनसाठी निघालेल्या या सात मैत्रिणींचा प्रवास आता थोडा रंजक, थोडा भावनिक आणि थोडा हटके असणार आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'पुन्हा झिम्मा' या बहारदार गाण्याची रंगतही आता डबल झाली आहे. अमितराज यांचे संगीत लाभलेल्या या जबरदस्त गाण्याला क्षितिज पटवर्धन यांनी शब्दबद्ध केले आहे तर या भन्नाट गाण्याला वैशाली सामंत आणि अपेक्षा दांडेकर यांच्या एनर्जेटिक आवाजाने चारचांद लावले आहेत.

सुहास जोशी, निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सायली संजीव, रिंकू राजगुरू, शिवानी सुर्वे यांच्यावर चित्रित झालेले हे गाणे या सात जणींना या सहलीत पुन्हा एकदा स्वतःची एक वेगळी ओळख करून देणार आहे. यात दिसणाऱ्या सिद्धार्थ चांदेकरच्या चेहेऱ्यावरच या चित्रपटातली धमाल कळुन येत आहे. गाण्याबद्दल संगीतकर अमितराज म्हणतात, '' या चित्रपटातील गाणी म्हणजे या चित्रपटातील या व्यक्तिरेखा आहेत. सगळीच गाणी करताना मज्जा आली. त्यांचे चित्रीकरणही कमाल झाले आहे. खरं सांगायचे तर 'झिम्मा २' ची गाणी बनवणे आमच्यासाठी खरंच आव्हानात्मक होते.

'झिम्मा'चे टायटल सॉन्ग प्रचंड लोकप्रिय झाले होते. त्यामुळे 'झिम्मा २'चे टायटल सॉन्ग करताना आमच्यावर तसे दडपण होते. कारण या गाण्याची पातळी 'झिम्मा २'मध्ये वर नेणे गरजेचे होते. त्यामुळे यात आम्ही काही नवीन घटकही समाविष्ट केले आहेत. प्रत्येकाला ठेका धरायला लावणारे ही गाणे झाले आहे. त्यात वैशाली सामंतने आपल्या अनोख्या आवाजाने हे गाणे अधिकच उत्स्फूर्त केले आहे. त्यामुळे 'झिम्मा २'चे टायटल सॉन्ग यावेळी तुफान झाले आहे.'' कलर यल्लो प्रॉडक्शनच्या सहकार्याने जिओ स्टुडिओज प्रस्तुत, चलचित्र मंडळी निर्मित, ज्योती देशपांडे, आनंद एल राय आणि क्षिती जोग निर्मित 'झिम्मा २'ची सफर २४ नोव्हेंबरला घडणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com