HBD Amjad Khan : चक्क थिएटरच्या सेटवर बांधल्या २ म्हशी! अभिनेते अमजद खानविषयीच्या न ऐकलेल्या गोष्टी

HBD Amjad Khan : चक्क थिएटरच्या सेटवर बांधल्या २ म्हशी! अभिनेते अमजद खानविषयीच्या न ऐकलेल्या गोष्टी

हिंदी चित्रपटसृष्टीतील 'शोले' चित्रपटातील 'गब्बर' या भूमिकेतून प्रसिद्ध झालेले अभिनेते अमजद खान.
Published on

हिंदी चित्रपटसृष्टीतील 'शोले' चित्रपटातील 'गब्बर' या भूमिकेतून प्रसिद्ध झालेले अभिनेते अमजद खान यांचा जन्म 12 नोव्हेंबर 1940 रोजी आंध्र प्रदेशातील हैदराबाद शहरात प्रसिद्ध चित्रपट अभिनेता जिकिरिया खान यांच्या पठाणी कुटुंबात झाला. आपल्या कारकीर्दीत एकूण 130 चित्रपटांत त्यांनी अभिनय केला. जरी त्यांनी बहुतेक चित्रपटांमध्ये खलनायकाची भूमिका आणि साईड रोल साकारले असले तरी, अमजदची यांची कारकीर्द जवळपास 16 वर्षे चालली.

चित्रपटांमध्ये दिसण्यापूर्वी ते थिएटर आर्टिस्ट होते. अमजद यांचे दोन भाऊ इम्तियाज खान आणि इनायत खान हेदेखील अभिनेते होते. 1951मध्ये 'नाजनीन' या चित्रपटात अमजद पहिल्यांदा दिसले होते. मात्र आजही त्यांना 'गब्बर' या नावानं ओळखलं जातं.

बऱ्याच कमी लोकांना माहिती आहे की, गब्बर या भूमिकेसाठी अमजद हे पहिली पसंत नव्हते. जावेद अख्तर यांनी सिनेमाची कहाणी सलीम खान यांच्यासोबत लिहीली होती. त्यांना गब्बर या भूमिकेसाठी अमजद यांचा आवाज आवडला नव्हता. आणि म्हणूनच शोले चित्रपटाच्या निर्मितीदरम्यान, गब्बर सिंगची भूमिका डॅनीला देण्यात आली होती, परंतु त्या वेळी तो 'धर्मात्मा' चित्रपटात काम करत असल्यामुळे त्याने शोलेमध्ये काम करण्यास नकार दिला होता.

यामुळे हे कॅरेक्टर अमजद यांनाच साकारण्याची संधी मिळाली. त्यांनी त्यांच्या अभिनयाच्या जोरावर हे कॅरेक्टर उचलून धरलं आणि एक नवा इतिहास रचला. पुढे जेव्हा 'शोले' चित्रपट प्रदर्शित झाला, तेव्हा अमजद खानने साकारलेली गब्बर सिंग ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांमध्ये इतकी लोकप्रिय झाली की लोक त्याच्या आवाजाची आणि हालचालींची वेळोवेळी नक्कल करू लागले.

अमजद खान यांना चहाचा खूप शौक होता. ते दररोज पंचवीस ते तीस कप चहा प्यायचे. जेव्हा त्यांना चहा मिळायची नाही तेव्हा त्यांना काम करणं कठीण व्हायचं. पृथ्वी थिएटरमध्ये अमजद जेव्हा एका नाटकाचे रिहर्सल करत होते तेव्हाचा एक किस्सा खूपच प्रसिद्ध आहे. त्यावेळी त्यांना चहा मिळाला नाही आणि या कारणामुळे ते खूप अस्वस्थ झाले. अमजद यांनी चहासाठी विचारल्यावर त्यांना दूध संपलं असल्याचं सांगण्यात आलं. दुसर्‍या दिवशी आपल्या चहाची तलब मिटवण्यासाठी त्यांनी सेटवर एक नव्हे, तर दोन म्हशी बांधल्या आणि चहा बनवणाऱ्याला सूचना दिली की, चहा बनत राहिली पाहिजे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com