Achyut Potdar
Achyut Potdar

Achyut Potdar : मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार यांचे निधन

बॉलिवूडसह मराठी चित्रपटसृष्टीत खास ओळख निर्माण करणारे ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार यांचे सोमवारी वयाच्या 91 व्या वर्षी निधन झाले.
Published by :
Team Lokshahi
Published on

(Achyut Potdar) बॉलिवूडसह मराठी चित्रपटसृष्टीत खास ओळख निर्माण करणारे ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार यांचे सोमवारी वयाच्या 91 व्या वर्षी निधन झाले. ते आजारी असल्याने ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते आणि या दरम्यानच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीत हळहळ व्यक्त होत आहे.

अच्युत पोतदार हे अभिनय क्षेत्रात येण्याअगोदर सैनिक अधिकारी होते. कॅप्टन पदावरून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी इंडियन ऑइल कंपनीत वरिष्ठ पदावर काम केले. मात्र अभिनयाची ओढ इतकी प्रबळ होती की त्यांनी 1980 च्या दशकात रुपेरी पडद्यावर पाऊल टाकले. जवळपास चार दशके त्यांनी हिंदी आणि मराठी सिनेमांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारत प्रेक्षकांचे मनोरंजन केले.

त्यांनी 125 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले. ‘आक्रोश’, ‘अर्ध सत्य’, ‘तेजाब’, ‘परिंदा’, ‘राजू बन गया जेंटलमन’, ‘रंगीला’, ‘वास्तव’, ‘भाई’, ‘दबंग 2’ आणि ‘व्हेंटिलेटर’ या चित्रपटांमधील त्यांच्या भूमिकांचे विशेष कौतुक झाले. परंतु राजकुमार हिरानी दिग्दर्शित ‘3 इडियट्स’ या सुपरहिट चित्रपटातील प्राध्यापकाची त्यांची भूमिका प्रेक्षकांच्या कायम स्मरणात राहिली. या चित्रपटातील त्यांचे संवाद आजही चर्चेत असतात.

चित्रपटांबरोबरच छोट्या पडद्यावरही त्यांनी ठसा उमटवला. ‘वागले की दुनिया’, ‘माझा होशील ना’, ‘मिसेस तेंडुलकर’ आणि ‘भारत की खोज’ यांसारख्या मालिकांतून त्यांनी परिपूर्ण अभिनय सादर केला. अभिनयासोबतच शिस्त, साधेपणा आणि मेहनत या गुणांमुळे ते चाहत्यांच्या मनात घर करून गेले.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com