आजारी होऊनही उपचार घेऊ शकत नाही यामी गौतम…नेमक कारण काय ?

आजारी होऊनही उपचार घेऊ शकत नाही यामी गौतम…नेमक कारण काय ?

Published by :
Published on

अभिनेत्री यामी गौतमीनं आपल्या दमदार अभिनयामुळे बॉलिवूडमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. सोशल मीडियावरही तिचा बराच मोठा चाहता वर्ग आहे. पण आता यामीच्या नावाची चर्चा एका वेगळ्याच कारणाने होत आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत यामी गौतमनं तिला झालेल्या अशा आजाराविषयी सांगितलं ज्यावर ती उपचारही घेऊ शकत नाही .

काही महिन्यांपूर्वीच यामीनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करताना तिला झालेल्या 'केराटोसिस पिलारिस' या आजाराची माहिती दिली होती. हा आजार त्वचेशी संबंधीत असून यामी मागच्या अनेक वर्षांपासून या आजाराचा सामना करत आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत यामीनं याबाबत मोकळेपणानं भाष्य केलं. सोशल मीडियावर पोस्ट शेअर केल्यानंतर आता मला खूप मोकळं वाटत आहे असं तिनं या मुलाखतीत सांगितलं .

यामी म्हणाली, 'या आजाराविषयी जाणून घेण्यापासून ते सोशल मीडियावर याबाबत उघडपणे बोलण्यापर्यंतचा माझा प्रवास बराच आव्हानात्मक होता. जेव्हा लोक मला शूटिंगच्या वेळी पाहायचे तेव्हा ते हे सर्व कसं लपवता येऊ शकतं याबाबत मला सल्ला द्यायचे. हे सर्व जसं आहे तसं स्वीकारण्यासाठी मला अनेक वर्षं लागली. पण आता सर्वांसमोर उघडपणे याबाबत बोलल्यावर आणि त्यावर लोकांच्या प्रतिक्रिया पाहिल्यानंतर मला खूप मोकळं वाटत आहे'.

यामी गौतमनं तिच्या इन्स्टाग्रामवर ऑक्टोबर महिन्यात एक पोस्ट शेअर केली होती. यामध्ये तिनं लिहिलं होतं, 'काही दिवसांपूर्वीच मी एक फोटोशूट केलं होतं आणि त्यानंतर ते सर्व फोटो एडिटींगसाठी जाणार होते. जेणेकरून माझ्या त्वचेवरील फ्लॉज झाकले जातील. तेव्हा मी ठरवलं मी आता माझ्या त्वचेच्या या समस्येला स्वीकारायला हवं. अगदीच तरुण वयापासून मी या समस्येचा सामना करत आहे आणि यावर कोणताही उपचार नाही. त्यामुळे हे सर्व जसं आहे तसंच स्वीकारणं योग्य आहे'.

यामीनं तिच्या पोस्टमध्ये पुढे लिहिलं होतं, 'ज्यांना याबद्दल फारसं माहीत नाही त्यांच्या माहितीसाठी, ही एक त्वचेची समस्या आहे. ज्यामुळे तुमच्या त्वचेवर दाणे होतात आणि विश्वास ठेवा यामुळे तुम्ही तुमचा आत्मविश्वास गमावता एवढं हे त्रासदायक असतं. मी अनेक वर्षं हे सहन करत आहे. पण आता मी हे सर्व आहे तसं स्वीकारायचं ठरवलं आहे'.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com