Ranveer Allahbadia : "नवीन अध्याय सुरु होत आहे...", रणवीर अल्लाहबादियाची सूचक पोस्ट
प्रसिद्ध युट्यूबर रणवीर अल्लाहबादिया गेले अनेक महिन्यांपासून खूप चर्चेत आहे. आई वाडिलांच्या नातेसंबंधावर केलेल्या अश्लील प्रतिक्रियेमुळे त्याच्यावर गुन्हे दाखल झाले होते. त्याचा 'इंडियाज गॉट लॅटेंट' शोवरदेखील बंदी आणली होती. दाखल झालेल्या गुन्ह्यांमुळे त्याने बराच काळ काम करण्यापासून ब्रेक घेतला होता. अशातच आता त्याने पुन्हा एकदा जोमाने काम करण्यास सुरुवात केली आहे.
रणवीरने 30 मार्च रोजी त्याच्या युट्यूब चॅनलवर 'लेट्स टॉक' वर एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्याचप्रमाणे त्याने त्याचे मित्रमंडळी आणि कुटुंबासमवेतदेखील काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत वाईट काळात साथ दिलेल्या सर्वांचेच त्याने आभार मानले आहेत. तसेच त्याने त्याच्या पुनरागमनाला नवीन जन्म असेदेखील संबोधले आहे. रणवीरने फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, "माझ्या सर्व प्रियजनांना धन्यवाद, थॅंक यु युनिव्हर्स. एक नवीन अध्याय सुरु होत आहे-पुनर्जन्म".
त्याचप्रमाणे रणवीरने व्हिडीओदेखील शेअर केले आहेत. त्याने या व्हिडीओमध्ये लिहिले की, "नमस्कार मित्रांनो, सर्वप्रथम मी माझ्या समर्थकांचे आणि चाहत्यांचे आभार मानू इच्छितो जे अशा कठीण काळातही माझ्या पाठीशी उभे राहिले. तुमच्या सकारात्मक संदेशांनी मला आणि माझ्या कुटुंबाला या कठीण काळात खूप मदत केली". दरम्यान आता रणवीरच्या या व्हिडीओची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु आहे.