सुर्य तापला! उष्माघाताने मराठवाड्यात पहिला तर राज्याच दुसरा बळी
उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत (Temperature Rising) जाताना दिसतोय. हवामान विभागाकडून (IMD) त्यामुळे सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आला आहे. त्यातच आता उष्माघाताने राज्यात काही मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मराठवाड्यात (Marathwada) उष्णताने एकाचा बळी घेतला आहे. तर उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील हासेगावमध्ये राहणाऱ्या लिंबराज तुकाराम सुकाळे या 50 वर्ष वय असणाऱ्या शेतकऱ्याचा उष्माघातानं मृत्यू झाला आहे.
सुकाळे हे सकाळपासून शेतात काम करत होते. दुपारी काम संपवून ते शेतातील गोठ्यावर पोहोचले. पाणी पिल्यानंतर त्यांना अचानक चक्कर आल्यानं सुकाळे यांना तात्काळ उपचारासाठी कळंब येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. हा मृत्यू उष्माघातानं झाला असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. सुकाळे यांचा झालेला मृत्यू मराठवाड्यातील उष्माघाताचा पहिला बळी तर राज्यातील दुसरा बळी ठरला आहे.
दरम्यान, उस्मानाबाद जिल्ह्यात सध्या उष्णतेने कहर केला असून तापमान चाळीस अंशांच्या वर आहे.अशा परिस्थितीमध्ये नागरिकांनी उन्हामध्ये फिरणे टाळावे व आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.