मुंबईच्या शोभना कपूर, अंतरा बॅनर्जींसह चार महिला वैज्ञानिकांचा एसईआरबीकडून गौरव
लोकशाही न्यूज नेटवर्क
विज्ञान आणि अभियांत्रिकी क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल राष्ट्रीय विज्ञान अकादमीच्या चार युवा महिला प्रशिक्षणार्थींना आंतरराष्ट्रीय महिला आणि कन्या दिवसानिमित्त एसईआरबी वुमेन एक्सलन्स अॅवॉर्डने गौरविण्यात आले आहे. विज्ञान आणि अभियांत्रिकी संशोधन महामंडळ (एसईआरबी) यांच्या वतीने हा पुरस्कार दिला जातो.
या पुरस्कारविजेत्यांना तीन वर्षांच्या कालावधीसाठी संशोधन संकल्पनेचा अभ्यास आणि पाठपुरावा करण्यासाठी 15 लाख रुपयांचे अनुदान प्रदान केले जाते. हा पुरस्कार 40 वर्षांखालील महिला वैज्ञानिकांना देण्यात येतो. ज्यांना एक किंवा त्यापेक्षा अधिक राष्ट्रीय संस्थांच्या वतीने युवा शास्त्रज्ञ पुरस्कार, युवा सहयोगिता पुरस्कार मिळाले असतील, अशांना हा पुरस्कार देण्यात येतो.
पुरस्कारासाठी निवडल्या गेलेल्या महिला शास्त्रज्ञांमध्ये आयआयटी, मुंबई येथे रासायनिक जीवशास्त्र क्षेत्रात काम करणाऱ्या सहायक प्राध्यापक डॉ. शोभना कपूर यांचा समावेश असून त्या होस्ट – पॅथोजेन इंटरॅक्शन्स अँड मेम्ब्रेन बायोलॉजी, केमिकल बायोलॉजी अँड बायोफिजिक्स
विषयातील तज्ज्ञ आहेत.
नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च इन रिप्रॉडक्टिव्ह हेल्थ, मुंबई येथील शास्त्रज्ञ बी डॉ. अंतरा बॅनर्जी यांचाही यात समावेश आहे. त्या सिग्नल ट्रान्सडक्शन, बायोलॉजी ऑफ रिप्रॉडक्शन अँड इनडोक्रिनॉलॉजी विषयातील तज्ज्ञ आहेत. तर, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अनिमल बायोटेक्नॉलॉजी, हैद्राबाद येथील शास्त्रज्ञ डी डॉ. सोनू गांधी या बायोनॅनोटेक्नॉलॉजी क्षेत्राशी संबंधित आहेत आणि नॅनोसेन्सर्स डिझाइन अँड फॅब्रिकेशन ऑफ लेबल फ्री बायोसेन्सर्स हे त्यांचे मुख्य विषय आहेत. आयआयटी, जोधपूरच्या सहाय्यक प्राध्यापक डॉ. रितू गुप्ता या नॅनोटेक्नॉलॉजी क्षेत्रात कार्यरत आहेत आणि मटेरिअल सायन्स, नॅनोडिव्हायेस अँड सेन्सर्स, हेल्थ अँड एनर्जी यामध्ये त्या तज्ज्ञ आहेत.