Hartalika Teej 2021: जाणून घ्या हरितालिकेच्या पूजेची वेळ
भाद्रपदातील शुक्ल पक्षाच्या तृतीयेवर हरतालिकेचे व्रत दरवर्षी केले जाते. भगवान शंकर पती म्हणून मिळावे, यासाठी पार्वती देवीने हे व्रत केले होते. तेव्हापासून लग्न झालेल्या महिलांपासून ते कुमारिका देखील दरवर्षी हरितालिकेचे व्रत न चुकता करतात. निर्जळी किंवा न खात हरितालिकेचे व्रत करण्याची प्रथा आहे. सौभाग्यप्राप्तीसाठी हे व्रत केले जाते.
९ सप्टेंबर रोजी पूजेचा मुहूर्त
भाद्रपद शुक्ल तृतियेला हरतालिकेच्या पूजेसाठी योग्य मुहूर्त सकाळी ६ वाजून ३ मिनिटांपासून सकाळी ८ वाजून ३३ मिनिटांपर्यंत चांगला मुहूर्त आहे तर प्रदोष काल हरितालिका व्रत पूजा मुहूर्त हा सायंकाळी ६ वाजून ३३मिनिटापासून ते रात्री ८ वाजून ५१ मिनटांपर्यंत आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी शिव-पार्वतीच्या मातीच्या मूर्तीचं विसर्जन करून महिला हा व्रत पूर्ण करतील.
शिवलिंगाची पूजा करण्याची प्रथाहरतालिकेच्या व्रतात उमा-महेश्वर यांचे पूजन केले जाते. प्रामुख्यानं सिंधुदुर्ग, गोवा, कर्नाटक किनारपट्टी भागात राहणाऱ्या अनेक कुटुंबांत गणपतीच्या दिवशी उमा महेश्वराचे पूजन केले जाते. महाराष्ट्रात 'हरतालिका' तृतीयेच्या दिवशी पूजण्याची प्रथा असली तरी दक्षिण भारतात मात्र थोड्या वेगळ्या पद्धतीने हरतालिकेचे व्रत केले जाते. हरतालिकेच्या दिवशी सुवर्णगौरी व्रत असते. यात गौरीचा केवळ मुखवट्याची पूजा केली जाते. तर महाराष्ट्रात अनेक गावात समुद्रावरील वाळू किंवा शेतातली माती आणून सखी, पार्वती आणि शिवलिंगाची पूजा करण्याची प्रथा आहे.