अमृता - गुळवेल या गुणकारी वनस्पतीचे जाणून घ्या आरोग्यदायी फायदे

अमृता - गुळवेल या गुणकारी वनस्पतीचे जाणून घ्या आरोग्यदायी फायदे

अमृता - गुळवेल नावाप्रमाणेच गुणकारी वनस्पती म्हणजे अमृता अर्थात गुळवेल. गुळवेलीची वेल असते आणि तिचे खोड औषधात वापरलं जाते.
Published by :
Dhanshree Shintre
Published on

डॉ. नमिता पारेख, डॉ. भाग्यश्री झोपे

अमृता - गुळवेल नावाप्रमाणेच गुणकारी वनस्पती म्हणजे अमृता अर्थात गुळवेल. गुळवेलीची वेल असते आणि तिचे खोड औषधात वापरलं जाते. गुळवेल ओळखायची खूण म्हणजे ती कापली असता, हे पाहा असे एक छान चक्र दिसते. अंगठ्या इतक्या जाडीची गुळवेल औषधात वापरायची असते.

चवीला जितकी कडू तितकीच गुणांनी मात्र ही गोड आहे. मुख्य म्हणजे गुळवेल त्रिदोष शामक म्हणजे वात, पित्त आणि कफ या तिन्ही दोषांचं शमन करणारी आहे. तुपाबरोबर घेतली तर वात कमी करते, साखरेबरोबर घेतली तर पित्त कमी करते आणि मधासह घेतली तर कफदोष कमी करते. सध्या आहे पावसाळ्याचे दिवस म्हणजे सर्दी ताप खोकला पटकन होण्याचे दिवस. पण बागेत किंवा कुंडीत गुळवेल लावलेली असेल तर काळजी करण्याची गरजच नाही.

अंगठ्या इतक्या आकाराचा गुळवेलीचा तुकडा घ्यावा. खलबत्त्यात थोडा चेचावा. पातेल्यात चार कप पाणी घेऊन त्यात ही चेचलेली गुळवेल घालावी आणि मध्यम आचेवर एक कप पाणी शिल्लक राहण्यापर्यंत उकळून काढा तयार करावा. हा काढा खूप कडू लागतो. त्यामुळे हवी असेल तर थोडी खडीसाखर टाकून शकता. पण यामुळे प्रतिकार शक्तीला ताकद मिळते आणि बघता बघता बरं वाटू लागतं. चार-पाच दिवस रोज एकदा हा काढा घेता येतो. घरातल्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत कोणालाही घेतलेला चालतो.

गुळवेलीला अमृता म्हणण्यामागे अजून एक कारण आहे आणि ते म्हणजे तिला जवळजवळ अमरत्वाचं वरदान मिळालेलं आहे. छोटीशी, काहीशी वाळलेली काडी जरी मातीत लावली ना, तरी ती हमखास लागते. बघता बघता हिरव्या पानांनी बहरून जाते. आपण घरात मनी प्लांट लावतो. त्या ऐवजी हे आरोग्य प्लांट लावलं तर खरोखरच आरोग्यम् धनसंपदा अनुभवता येईल.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com