Healthy Tips : केसांचे आरोग्य चांगले आहे का? नाहीतर त्यावर करा 'हे' उपाय
डॉ. नमिता पारेख, डॉ. भाग्यश्री झोपे
स्त्रीचे सौंदर्य हे तिच्या केसांवर अवलंबून असते. केस आरोग्याचं हे सौंदर्याचं प्रतीक असते. केस गळू नयेत, अकाली पांढरे होऊ नये, रेशमी आणि मजबूत राहावे ही प्रत्येकाची इच्छा असते. त्यासाठी योग्य प्रयत्न करणंही तेवढचं आवश्यक असते. प्रदूषण, तीव्र सूर्यप्रकाश, धुळ आणि धुराचा सतत संपर्कांमुळे केसांचं जास्तप्रमाणात नुकसान होत असते. त्यातच केस धुण्यासाठी किंवा कंडिशनिंगसाठी शॅम्पू, कंडिशनर मध्ये असणाऱ्या केमिकलची अजूनही भर पडते. त्याने केसांचे आरोग्य अजूनही घातक होते. या लेखात जाणून घेऊया तीन सोपे उपाय , की जे निरोगी आणि रेशमी केसांसाठी उचललेलं पहिलं पाऊल असेल.
पहिला उपाय
आठवड्यातून एकदा किंवा दोनदा केस धुण्याअगोदर केसांच्या मुळाशी ओल्या नारळाचं दूध अर्ध्या तासासाठी लावून ठेवावं. यासाठी ओल्या नारळाचे तुकडे मिक्सरमध्ये फिरवून त्याची पेस्ट तयार करावी. गाळणीच्या मदतीने गाळून मिळालेलं नारळाचं दूध हलक्या हातांनी केसांच्या मुळाशी लावावं. त्यानंतर अर्ध्या तासानंतर केस धुवावेत.
दुसरा उपाय
दुसरा उपाय म्हणजे केस धुण्यासाठी केमिकलस् पासून बनवलेला शॅम्पू, कंडिशनर न वापरता शिकेकाई, रिठा, आवळा, जास्वंदाची फुलं आणि पानं यापासून बनवलेलं पाणी वापरावे. यासाठी शिकेकाईचा १ शेंग, 3-4 रीठे, चमचाभर, आवळाकाठी, जास्वंदाची 3 ते 4 फुलं आणि 3 ते 4 पानं घ्यावीत. शिकेकाई आणि राठे खलबत्यामध्ये थोडेसे कुटून आतील बिया काढून घ्या. आता मिक्सरमध्ये शिकेकाई, रिठा, आवळाकाठी जाडसर बारीक करुन घ्यावेत. त्याच मिक्सरच्या भांड्यात जास्वंदाची फूले आणि पाने टाकावीत. आता गॅसवर एक पातेल ठेवा. त्यामध्ये पाणी टाकून एक उकळी आणावी. त्यामध्ये सर्व मिश्रण टाकावे आणि झाकून ठेवावे. सकाळी पाणी गाळून घेऊन या पाण्याने केस धुवावे.
तिसरा उपाय
तिसरा उपाय म्हणजे रात्री झोपण्यापूर्वी एक चमचा त्रिफळा चूर्णात एक चमचा मध आणि अर्धा चमचा तूप मिक्स करून घ्यावं. यामुळे केसांचं आरोग्य सुधारतं, शिवाय डोळ्यांची आणि दृष्टीची शक्ती सुद्धा वाढते.