तांब्याच्या भांड्यातून पाणी पिताय? तर 'या' गोष्टींची काळजी घ्या...
तांब्याच्या भांड्यातून पाणी पिणे आरोग्यासाठी लाभदायक ठरत असं म्हटलं जातं. तांबे धातू नैसर्गिक जंतुनाशक आहे. त्यामुळे तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी प्यायाल्याने अनेक आजारांवर नियंत्रण मिळवता येते. मात्र, तांब्याच्या भांड्यातून पाणी पिताना योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे असते. चुकीच्या पद्धतीने पाणी प्यायल्याने शरीराचे नुकसानही होऊ शकते. तांब्याच्या भांड्यातून पाणी कसे प्यावे, याचा आढावा घेऊयात.
जर तुम्ही दिवसभर तांब्याच्या बाटलीत किंवा भांड्यात ठेवलेले पाणी पीत असाल तर तुमच्या शरीरात तांब्याचे प्रमाण जास्त होण्याची शक्यता असते. यामुळे लिव्हर आणि किडनी निकामी होण्याच्या धोक्यासोबतच गंभीर मळमळ, चक्कर येणे, पोटात दुखणे या समस्या देखील होऊ शकतात.
तांब्यांच्या भांड्यातून पाणी प्यायल्याने शरीरातील लाल रक्तपेशी वाढतात त्याचबरोबर हाडांना बळकटी येते. एका अहवालानुसार, तांब्याच्या भांड्यात पाणी पिण्याचे काही नुकसानदेखील आहेत. सकाळी रिकाम्या पोटी लिंबू आणि मध मिसळलेले पाणी पिणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. पण तांब्याच्या भांड्यात लिंबू व मध घातलेले हे पाणी प्यायल्यावर ते विषासारखे काम करते. वास्तविक, लिंबूमध्ये आढळणारे अॅसिड तांब्यासोबत मिक्स होऊन शरीरात अॅसिड तयार होते, ज्यामुळे पोटदुखी, पोटात गॅस आणि उलट्या होण्याचा धोका असतो.