Castor Benefits : एरंडेलाच्या सेवनाने पचनसंस्थेला होतील 'हे' निरोगी फायदे, कोणते ते जाणून घ्या...
एरंडेल म्हणजे एरंडाच्या बियांपासून काढलेलं तेल. अगदी आजही एरंडेल अगदी सहजपणे उपलब्ध असतं. आयुर्वेदात तर याचा भरभरून वापर केलेला असतोच, पण घरगुती औषधातही एरंडेल मोठ्या प्रमाणात वापरलं जातं. खरं तर एरंडेलाचे अनेक फायदे असतात आणि वेगवेगळ्या रोगांवर वेगवेगळ्या प्रकारांनी एरंडेलाची योजना केली जाते. अन्न सेवन केलं की त्याचं पचन होतं. पचनानंतर तयार झालेला सारभागाचे शरीरामध्ये शोषन होतो, यातूनच आपले सप्त धातू, शक्ती, रोगप्रतिकारशक्ती वैगरे यांना ताकद मिळते. आणि मलभाग मात्र घाम, युरिन आणि मलच्या रूपांनी शरीराबाहेर टाकला जातो.
पण ही आदर्श परिस्थिती झाली, प्रत्यक्षात मात्र आपलं चुकीचं खाणं-पिणं, मानसिक ताण तणाव, वेगांचा आवरोध, जेवणाच्या तसेच झोपण्याच्या सायकलमध्ये झालेले अनैसर्गिक बदल, कृत्रिम पद्धतीनी तयार केलेल्या औषधांचं सेवन अशा अनेक कारणांनी ही प्रक्रिया 100% पूर्ण होतेच असं नाही. पर्यायानी आतड्यांमध्ये मलभाग किंवा अशुद्धी साठत राहते. त्यात रोज सेवन केलेल्या अन्नाची भर पडते आणि हलके हलके आतड्यात साठलेली अशुद्धी आतड्यापुरती सीमित न राहता, अख्या शरीरामध्ये पसरू लागते. यामुळे अनेक अनेक रोगांना आमंत्रण मिळतं. या दुष्टचक्रातून बाहेर येण्यासाठी एक अगदी रामबाण आणि सोपा उपाय म्हणजे दर पंधरा दिवसांनी एरंडेल घेणं.
आठ दहा वर्षांच्या बालकापासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सगळे जण ही तोडगा घेऊ शकतात. लहान मुलांसाठी साधारणतः एक ते दीड चमचा आणि मोठ्यांसाठी साधारणतः दोन ते अडीच चमचे या प्रमाणात रात्री झोपण्यापूर्वी एरंडेल घेता येतं. दुसऱ्या दिवशी सकाळी थोडी लवकर जाग येते आणि दोन-तीन वेळा जुलाब होऊन पोट साफ होऊन जातं. कदाचित दोन-तीन पेक्षा जास्त जुलाब झाले, तर पुढच्या वेळेला एरंडेलाचं प्रमाण थोडं कमी करावं आणि अगदी एखादा जुलाब झाला तर प्रमाण थोडं वाढवावं. आयुर्वेदात सांगितल्याप्रमाणे जर एरंडेल घेतलं, तर ते अगदी हसऱ्या चेहऱ्यानी घेता येतं. यासाठी सुंठ थोडीशी चेचून त्यापासून छान चहा तयार करावा. गरमागरम चहात एरंडेल मिसळावं आणि घरातल्या सगळ्यांनी घेऊन टाकावा.