Dahi : सावधान! उन्हाळ्यात रोज दही खाताय? मग ही बातमी वाचाच...
डॉ. नमिता पारेख, डॉ. भाग्यश्री झोपे
प्रत्येकाच्या स्वयंपाकघरामध्ये दही नेहमीच असते. रात्री झोपण्यापूर्वी दही लावले जाते. ज्या घरामध्ये दूध, दही, ताक, तूप यासर्व गोष्टी असतात परंतू हेच दह्याचे सेवन आरोग्यासाठी चांगले असले तरी आयुर्वेदामध्ये दही रोजच्या आहारात नसावं असं सांगितलेलं आहे. अनेकांना हे ऐकून आश्चर्य वाटलं असेल. विशेषतः उन्हाळ्यामध्ये जेवताना ताटामध्ये थोडं तरी दही घेण्याची सवय आपल्याकडे अनेकांना असते. पण आंबट वस्तुंबद्दल आयुर्वेदात म्हटलेलं आहे. दह्यासारखे आंबट पदार्थ स्पर्शाला थंड असले तरी वीर्यानी उष्ण असतात. त्यामुळे दही खाताना थंड वाटलं तरी नंतर पोटात गेल्यावर मात्र ते उष्णता करते. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये दही नक्की खाऊ नये.
दही खाताना अजून एक लक्षात ठेवायचा नियम म्हणजे सूर्यास्तानंतर दही अजिबात खाऊ नये. दही उष्ण असते, पचनासाठी जड असते. अभिष्यंदी म्हणजे शरीरात पाणी भरण्यास म्हणजे सूज येण्यास कारण ठरतं. रात्रभर छान लागलेल्या दह्यातले थोडसे जरी दही काढलं तरी त्याठिकाणी थोड्याच वेळात पाणी जमलेलं आपण सर्वांनी पाहिलेलं मिळते. दही खाण्यामुळे नेमकी हीच प्रक्रिया शरीरातही होते.
त्यामुळे दही रोज खाऊ नये. सूर्यास्तानंतर अजिबात खाऊ नये. उन्हाळ्यात आणि शरद ऋतूत दही खाऊ नये. थंडीच्या दिवसात कधीतरी खावसं वाटलं, तरी ते नुसतं न खाता मुगाचं वरण, आवळा, पत्री खडीसाखर, तूप आणि मध यातील एका तरी पदार्थाबरोबर खावे.
दह्याऐवजी ताक, ते सुद्धा रात्रभर नीट लागलेल्या ताज्या दह्यात पाणी टाकून, रवीनी घुसळून केलेलं पातळ ताक, त्यात थोडीशी जीऱ्याची पूड आणि सैंध किंवा काळं मीठ टाकून दुपारच्या जेवणानंतर घेणं हे कधीही चांगलं.