सर्दी-खोकल्यावर गुणकारी उपाय; फक्त तीन घटकांनी बनवा काढा
डॉ. नमिता पारेख, डॉ. भाग्यश्री झोपे
वाढतं प्रदूषण, रेडीमेड गोष्टी खाण्याचं वाढतं प्रमाण, सतत एअर कंडिशनर, पंख्याचा वापर, वेळी अवेळी घेतलेले थंड पदार्थ, या सगळ्यामुळे सध्या सर्दी खोकला होण्याचं प्रमाण वाढलेलं दिसतं. खोकल्यावर, लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांना गुणकारी ठरणारे एक उपाय जाणून घ्या...
यासाठी आपल्याला लागतात फक्त तीन गोष्टी.
1 - बेहडा
2 - ज्येष्ठमध
3 - अडूळशाचं एक पान
खलबत्याच्या मदतीनी एक बेहडा थोडा बारीक करून घ्यावा, ज्येष्ठमधाची करंगळीच्या आकाराची काडी सुद्धा थोडी चेचून घ्यावी. शक्य असेल तर ताजं, थोडंसं पिकलेलं अडूळशाचं पान कात्रीनी किंवा सूरीनी कापून घ्यावं. ताजं पान उपलब्ध नसेल तर बाजारात मिळणारं अडूळशाचं पंचांग वापरलं तरी चालेल. या तिन्ही गोष्टी एका पातेल्यात घेऊन त्यात दोन कप पाणी मिसळावं, अर्धा कप शिल्लक राहीपर्यंत मंद ते मध्यम आचेवर उकळावं आणि तयार झालेला काढा गाळणीनी गाळून घ्यावा.
ज्येष्ठमध गोड चवीचं असल्यामुळे हा काढा चवीला चांगला लागतो. अगदी तान्ह्या बाळालाही दोन ते तीन चमचे या प्रमाणात हा काढा दिलेला चालतो. पाच वर्षांपेक्षा लहान मुलांना पाव कप आणि त्यापेक्षा मोठ्या मुलांना आणि मोठ्यांना अर्धा कप या प्रमाणात हा काढा दिवसातून एकदा कधीही देता येतो. गुंगी आणणाऱ्या कोणत्याही कफ सिरप पेक्षा ही उपाय अधिक प्रभावी असते आणि दोन-तीन दिवसातच खोकल्यामध्ये फरक झालेला समजतो. खोकला बरा झाल्यानंतरही दोन-तीन दिवस अजून हा काढा घेत राहिला तर खोकला मुळापासून बरा होऊ शकतो.