Eye Care: त्रिफळा आणि बेलाची पान डोळ्यांचे हिरावलेलं सतेजपण परत आणतील, कसे ते जाणून घ्या...
सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगात आपल्या सगळ्यांच्या डोळ्यांवरती खूप ताण येत असतो. कधी दूरदर्शन, कधी मोबाईल, कधी लॅपटॉप, कधी संगणक अशा प्रकारे काही ना काही कारणांनी आपली डोळे स्क्रीनवर खिळलेले राहतात. लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सगळ्यांचाच यात समावेश असतो. यातूनच मग डोळे लाल होणं, डोळ्यांची आग होणं, डोळे दुखणं, सकाळी उठल्यावर डोळे चिकट होणं अशी लक्षणं दिसू लागतात.
कधी एकदा रात्र होते आणि डोळे मिटून झोपता येतं असं वारंवार मनात येऊ लागलं की समजून जावं, डोळ्यांची शक्ती कमी पडते आहे, डोळे निस्तेज दिसू लागले आहेत. डोळ्यांना पुन्हा सतेज करण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी एक चमचा त्रिफळा, त्यात एक चमचा तूप आणि एक चमचा मध मिसळून घेणं उत्तम असतंच. बरोबरीने डोळ्यांवर बाहेरून हा एक उपाय करता येतो.
महादेवांना प्रिय असणारी बेलाची ताजी पानं आणावीत, स्वच्छ धुवून कात्री किंवा सुरीच्या मदतीनी कापावीत. मिक्सर च्या मदतीनी वाटून पानांची बारीक पेस्ट तयार करावी. आता पातळ सुती कापड किंवा गॉजचा तुकडा घ्यावा. यावर बेलाच्या पानांची पेस्ट ठेवून तयार केलेली घडी बंद डोळ्यांवर ठेवावी.
साधारण अर्ध्या तासासाठी ही घडी ठेवावी. यामुळे डोळ्यातली उष्णता कमी होते, दृष्टी सुधारते आणि डोळे चांगले राहतात असे दिसून येतं. डोळ्यांचं आरोग्य चांगलं राहावं यासाठी सुद्धा हा उपाय करता येतो. आठवड्यातून किमान एक-दोन वेळा हा उपाय करून पहा आणि पाहा फरक.