Health Care | हिवाळ्यात तीळ खाण्याचे आरोग्यदायी फायदे; अनेक आजार होतील दूर
नुकतीच आपण सर्वांनी, तिळगुळ घ्या, गोड बोला असं म्हणत मकर संक्रांत साजरी केली. संक्रांतीच्या दिवसात म्हणजे ऐन हिवाळ्यात तीळ खाण्याची आपल्याकडे पद्धत आहे ती उगाचच नाही. शरीरात वाढणारा कोरडेपणा कमी करण्यासाठी स्निग्ध आणि उष्ण गुणाचे तीळ हिवाळ्यात अगदी उपयुक्त असतात.
बाह्य वातावरणाचा आपल्या शरीरावर, आरोग्यावर सातत्यानी परिणाम होत असतो. हिवाळ्यात त्वचा फुटते, कोरडी पडते हे आपण पाहू शकतो पण शरीराच्या आतही हा कोरडेपणा परिणाम करत असतो. स्निग्ध गुणाचे तीळ अंतर्बाह्य कोरडेपणा दूर करण्यास मदत करणारे असतात.
आतड्यात कोरडेपणा वाढला की शौचाला कडक होणं, जोर करावं लागणं, क्वचित फिशरचा त्रास होणं यासारखे त्रास होऊ शकतात. थंडीच्या दिवसात यासाठी रात्री झोपण्यापूर्वी दोन चमचे तीळ नीट चावून खावे आणि वरून थोडंसं गरम पाणी प्यावं. यामुळे पोट साफ होण्यास मदत मिळते.
फिशर किंवा मूळव्याधमुळे रक्त पडत असेल तर तीळ बारीक वाटून त्याचा लेप करण्याचाही उपयोग होतो. तिळाचा लेप तयार करण्यासाठी तीळ सात आठ तासांसाठी पाण्यात भिजत घालावेत व नंतर खलबत्त्याच्या किंवा मिक्सरच्या मदतीने तिळाची बारीक पेस्ट तयार करावी.
आयुर्वेदात तीळ दन्त्य म्हणजे दातांना हितकर आणि केश्य म्हणजे केसांसाठी उपयुक्त सांगितलेले आहेत. दात आणि केस हे दोन्ही अस्थिधातुशी अर्थात हाडांशी संबंधित शरीर अवयव आहेत आणि खरोखरच आधुनिक शास्त्रनुसार तीळ कॅल्शियमचा उत्तम स्रोत असल्याचं सिद्ध झालेलं आहे. दातांच्या आरोग्यासाठी हिवाळ्यात सकाळी एक - दोन चमचे काळे तीळ चावून खाणं आणि वरून थंड पाणी पिणं हे हितकारक असतं.
थंडीत जखम झाली तर ती जास्ती दुखते असं म्हणतात. हवेतल्या कोरडेपणामुळे जखम तडतडली तरी खूप वेदना होतात. अशा वेळेला जखम भरून यावी यासाठी तिळाची पेस्ट वरून लावून ठेवण्याचा उत्तम उपयोग होतो. पडल्यामुळे जर एखाद्या ठिकाणी मार लागला, हात पाय मुरगळला तर त्या ठिकाणी तिळाचं तेल लावून वरून तिळाच्या पुरचूंडीनी शेक करण्यामुळे बरं वाटतं.
काळे तीळ पांढऱ्या तिळापेक्षा अधिक शक्तिशाली असतात पण तीळ उष्ण असल्यामुळे तिळाचा नियमित उपयोग हिवाळ्यातच करावा. पूर्ण वर्षभर तीळ खायचे असतील तर अगोदर आपल्या वैद्यांचा सल्ला घेणं चांगलं.