मासिक पाळीच्या त्रासावर घरगुती आणि नैसर्गिक उपाय, कोणते ते जाणून घ्या...
अनेकांना मासिक पाळीचा त्रास होतो. ज्यात मासिक पाळी आली की 20 दिवस अंगावरून जातं. त्यानंतर मध्ये चार-पाच दिवस गेले की पुन्हा पाळी येते आणि पुन्हा अंगावरून जातं. यावर अनेक उपाय केले तरी त्याचा काही फरक नाही पडत अशावेळी काय कराव जाणून घ्या...
यासाठी घरच्या घरी दिवसातून दोन वेळा तांदळाचं धुवण घेतल्याने तुम्हाला या त्रासातून आराम मिळेल. यासाठी दोन चमचे कच्चे तांदूळ, कपभर पाण्यात पाच ते सहा तासांसाठी किंवा रात्रभर भिजत घालावेत. त्यानंतर सकाळी हातानी कुस्करून पांढर झालेलं पाणी गाळून घेऊन प्यावं. उरलेले तांदूळ स्वयंपाक घरात वापरायला हरकत नाही.
रस्त्याच्या कडेला उंच सरळ वाढणारा अशोक आणि सीता अशोक ही दोन वेगवेगळी झाडं असतात. सीता अशोक ही वनस्पती गर्भाशयाला ताकद देऊन अशा प्रकारच्या त्रासावर उत्तम परिणाम देणारी आहे. खऱ्या अशोकाची साल मिळाली, तर सहाणेवर थोडं दूध घेऊन त्यात ही साल उगाळून तयार केलेली पेस्ट चमचाभर घेऊन सकाळ संध्याकाळ घेतल्याने देखील तुम्हाला त्याचा उपयोग होईल.
याशिवाय हाता पायाला शुद्ध नैसर्गिक मेंदी लावणे, आहारात साळीच्या लाह्या, मुगाचं वरण-भात, ज्वारीची भाकरी, दुधी, तोंडली, कोहळा, पडवळ, परवर अशा थंड गुणांच्या फळभाज्या, घरी बनवलेले साजूक तूप यांचा अधिकाधिक समावेश करा हे सुद्धा आवश्यक आहे.