डॉ. नमिता पारेख, डॉ. भाग्यश्री झोपे
धणे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. उन्हाळ्यात धण्याचा वापर जास्त केला जातो. मातीच्या मडक्यात रात्री झोपण्यापूर्वी, चमचाभर अर्धवट कुटलेले धणे, एक कप थंड पाण्यात भिजत घालावेत. सकाळी हाताने कुस्करून गाळून घेतलेल्या पाण्यात थोडी खडीसाखरेची पूड मिसळून प्यावं. यामुळे शरीरात अतिरिक्त वाढलेली उष्णता लघवीच्या माध्यमातून बाहेर निघून जायला मदत मिळते.
शरीरातील उष्णता वाढल्यामुळे अनेकांना सारखी तहान लागते. कितीही पाणी प्यायलं तरी तहान शमत नाही. उलट तोंड, जीभ, घसा सतत कोरडा पडल्यासारखं वाटतं. अशा वेळेला धण्याचा काढा करून तो कोमट किंवा थंड झाल्यावर प्यायल्याने बरं वाटतं. यासाठी 10 ग्रॅम अर्धवट कुटलेल्या धण्याचा दोन कप पाण्यात अर्धा कप पाणी शिल्लक राहीपर्यंत काढा करावा आणि प्यावा.
धणे हे जंतनाशकही असतात. विशेषतः लहान मुलांना महिन्यातील सात दिवसांसाठी सकाळी अर्धा चमचा धण्याची पूड आणि मध यांचं मिश्रण देण्याचा उपयोग होतो. थकवा जाणवत असेल, तर चमचाभर धणे आणि चमचाभर खडीसाखर हे मिश्रण चावून खावं. यामुळे आराम मिळतो. धणे हे एक उत्तम औषधही आहे. उन्हाळ्यात धण्याचा या पद्धतीने वापर केला तर आरोग्य सुरक्षित राहते.