शरीर, मन आणि आत्मा यांच्यातील संतुलन कसे पाळावे? जाणून घ्या...
शरीरात मेंदूचे स्थान सर्वात वरच्या बाजूला असतो आणि मेंदूमुळेच सर्व जीवन व्यापार चालू शकतात. शरीरशास्त्रात डावा मेंदू, उजवा मेंदू आणि मागचा मेंदू असे मेंदूचे तीन भाग केलेले असतात. आणि अगदी त्याचप्रमाणे तीन शिरे, सहा हात असं श्री दत्तात्रेयांचही वर्णन केलेलं असतं. मेंदूच्या या तिन्ही भागात समन्वय असलं तरच शरीराची सर्व कामं नीट होऊ शकतात हे आपण समजू शकतो पण जीवनाच्याही तीन बाजू असतात.
एक बाजू शरीराचे भौतिक व्यापार चालवते. दुसरी बाजू भावनिक तसेच मानसिक व्यापार चालवते आणि तिसरी बाजू सर्वसमावेशक म्हणजे अध्यात्माचा विचार करते. सर्वसामान्य व्यक्तींना समजो किंवा न समजो, आपल्या सर्वांच्या आत या तिन्ही पातळीवर काम होत असतं. सुखी जीवनासाठी भावना, मन यांचं योगदान मोठं असतं हे आपल्याला समजतं पण भावनांवर आपलं नियंत्रण नसतं, मनालाही आपण भौतिक वस्तूंच्या योगे समाधानी करण्याचा प्रयत्न करत राहतो पण हे समाधान क्षणभंगुर असतं आणि त्यातून आपली केवळ ओढाताण होत राहते.
यातून तारून नेतं ते फक्त सर्वसमावेशक मार्गदर्शन. आणि असं मार्गदर्शन केवळ सद्गुरुच करू शकतात. भारतीय परंपरेत आपण म्हणतो की ब्रम्हा, विष्णू आणि महेश हे तिघे सृष्टीचा व्यापार चालवतात. पण त्या बरोबरीने परमशांती अनुभवायची असेल तर या तिघांच्या एकत्रित अस्तित्वाचे म्हणजेच श्री दत्तात्रेयांचे आशीर्वाद आवश्यक असतात.
अनसुया-नंदन म्हणजे जिथे असूया नाही, तिथेच दत्तात्रेयांचा जन्म होतो हे लक्षात आणून देणारा आजचा हा दिवस. आयुष्य आनंदानी, आरोग्यानी परिपूर्ण जगता यावं, त्याला समाधान आणि परमशांतीची जोड मिळावी यासाठी सद्गुरूंना शरण जाण्याची प्रेरणा तुम्हा आम्हा सर्वांना मिळो हीच श्री दत्तात्रेयांच्या चरणी प्रार्थना.