Chinese chastetree: जाणून घ्या वातदोष आणि सूज कमी करणाऱ्या 'या' वनस्पतीबद्दल
डॉ. नमिता पारेख, डॉ. भाग्यश्री झोपे
वातदोषाला कमी करून वेदना आणि सूज कमी करणारी वनस्पती म्हणजे निर्गुडी. निर्गुडीचं मध्यम आकाराचं झुडूप असतं आणि पानं बेलाप्रमाणे तीन-तीन किंवा पाच-पाचच्या संख्येत असतात. ती कुस्करली असता त्यातून विशिष्ट सुगंध येतो. वातशमनासाठी उत्तम असल्याने निर्गुडी अनेक प्रकारांनी वापरली जाते.
अभ्यंगाच्या तेलात निर्गुडी हमखास असते. मुकामार लागल्यामुळे शरीरावर कुठेही सूज आली, दुखु लागलं, कुठलाही सांधा दुखत असला तर त्यावर निर्गुडीचा लेप लावता येतो. कसा करायचा हा लेप? जाणून घ्या.
निर्गुडीची ताजी पानं घ्यावीत, थोडीशी कापून मिक्सरच्या मदतीनी बारीक करावीत. एका पसरट पॅनमधे निर्गुडीचा हा कल्क काढावा आणि मंद आचेवर शिजवावा. सोसवेल इतका गरम असताना दुखणाऱ्या भागावर किंवा सांध्यावर, साधारण अर्ध्या तासासाठी लावून ठेवावा. पूर्ण वाळण्यापूर्वी, आधी गरम पाण्यात भिजवलेल्या कापडाच्या मदतीनी काढून घ्यावा आणि वरून वातशामक द्रव्यांनी सिद्ध तेल लावावं. सांधे खूप दुखत असले तर हा उपचार रोज केला तरी चालतो, एरवी आठवड्यातून 2-3 वेळा ही थेरपी केल्यानी लगेच बरं वाटु लागतं.