साळीच्या लाह्या खाण्याचे फायदे तुम्हाला माहित आहेत का? जाणून घ्या
डॉ. नमिता पारेख, डॉ. भाग्यश्री झोपे
प्रत्येक घरात असायलाच हवा असा एक पदार्थ म्हणजे साळीच्या लाह्या. लोकांना अनेकदा चुरमुरे आणि साळीच्या लाह्या यातील फरक समजत नाही. पण चुरमुरे म्हणजे, भेळ वगैरे ज्यापासून बनवतात ते, आणि साठेसाळीच्या तांदळापासून बनवलेल्या, आणि सहसा पूजेसाठी वापरल्या जातात, त्या साळीच्या लाह्या. चूरमूरे अगदी पांढरे शुभ्र असतात तर लाह्या थोड्या लालसर असतात.
लाह्या या चवीला गोड, पचायला हलक्या आणि थंड गुणाच्या असतात. अग्नीला प्रदीप्त करतात. ताकद वाढवतात. आणि पित्त तसंच कफदोषाला कमी करतात. म्हणूनच ज्यांना वजन वाढू द्यायचं नाही किंवा वाढलेलं वजन कमी करायचं आहे, त्यांच्यासाठी साळीच्या लाह्यासारखा दुसरा उत्तम पदार्थ नाही.
सध्या नाश्ताला अनेक घरात कॉर्न फ्लेक्स आणि दूध घेण्याची पद्धत रूढ झालेली आहे. पण कॉर्न म्हणजे मका. वात वाढवणारा असतो. त्यातून त्याचे फ्लेक्स बनवताना ते चपट केले की पचायला अजूनच अवघड होतात. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे कॉर्न फ्लेक्समध्ये चक्क मीठ असतं. त्यामुळे ते दुधाबरोबर मिक्स केलं की विरुद्ध अन्न होतं आणि आयुर्वेदात विरुद्ध अन्न हे अनेक अनेक रोगांना आमंत्रण देणारं सांगितलेलं आहे.
पण या अशा कॉर्न फ्लेक्सला उत्तम पर्याय म्हणजे साळीच्या लाह्या. सकाळी नाश्तासाठी छान. एक भांडं घ्या. त्यात तुम्हाला हव्या तेवढ्या साळीच्या लाह्या घ्या, चवीनुसार अर्धा ते एक चमचा खडीसाखर टाका आणि लाह्या भिजतील एवढं दूध मिसळावं. अशा दूध - लाह्या घेतल्या की पोट तर भरतं पण जड अजिबात होत नाही. शिवाय लाह्या शक्ती देणाऱ्या असल्याने त्यांची ताकद दुपारच्या जेवणापर्यंत टिकून राहते.