Pimples Home Remedies : चेहऱ्यावर पिंपल्स येण्याची कारणे व घरगुती उपाय
चेहऱ्यावर पिंपल्स किंवा मुरूम येण्याची समस्या अनेक तरुण तरुणींमध्ये होत असते. पिंपल्सचा परिणाम चेहऱ्याच्या सौंदर्यावर होत असतो. याला तारुण्यपिटिका, मुरुमे, पिंपल्स (pimple) किंवा वैद्यकीय भाषेत acne vulgaris असेही म्हणतात. आपल्या त्वचेतील तेलग्रंथी जेव्हा हार्मोन्सच्या बदलामुळे किंवा बॅक्टेरियामुळे संक्रमित होतात तेंव्हा चेहऱ्यावर पिंपल्स निर्माण होतात. चेहऱ्यावर पिंपल्स अधिक असल्यास त्यावर वेळीच योग्य उपाय करणे गरजेचे असते कारण त्यावर उपचार न केल्यास नंतर चेहऱ्यावर डाग पडण्याचीही शक्यता असते.
चेहऱ्यावर पिंपल्स येण्याची कारणे :
• हार्मोन्सच्या बदलामुळे,
• केमिकल्सयुक्त सौन्दर्य प्रसाधनांचा अतिवापर,
• त्वचेतील घाम, हवेतील धूळ व वायू प्रदूषणामुळे,
• तेलकट, मसालेदार आहार आणि फास्टफूड खाण्याच्या सवयीमुळे,
• पाणी कमी पिण्याच्या सवयीमुळे,
• मानसिक ताणतणावामुळे चेहऱ्यावर मुरूम अधिक येत असतात.
मुलतानी माती –
दोन चमचे मुलतानी माती, एक चमचा गुलाबजल आणि चार ते पाच ड्रॉप्स लिंबूरस हे मिश्रण थोडे पाणी घालून एकत्रित करून पेस्ट तयार करावी. हा लेप पिंपल्स च्या ठिकाणी किंवा संपूर्ण चेहऱ्यावर लावावा. 15 मिनिटानंतर चेहरा धुवून घ्यावा. यामुळे चेहऱ्यावरील धूळ निघून जाते आणि पिंपल्स कमी होण्यास मदत होते.
कोरपडीचा गर –
चेहऱ्यावर मुरूम असल्यास त्याठिकाणी कोरफडीचा गर लावावा आणि 15 मिनीटांनी चेहरा पाण्याने धुऊन घ्यावा. पिंपल्सवर कोरफडीचा गर खूपच उपयोगी ठरतो. या आयुर्वेदिक उपायाने त्वचेवरील धुळ आणि तेलकटपणा कमी होण्यास मदत होते व पिंपल्सचा त्रास कमी होतो.
लिंबाचा रस –
लिंबाचा रस काढून एका वाटीत ठेवावा. रात्री झोपण्यापूर्वी कापसाचा बोळा त्या रसात बुडवून मुरूम असलेल्या ठिकाणी लावावा. यामुळे पिंपल्स सुजल्याने होणारी वेदना आणि सूज कमी होते. पिंपल्समधील बॅक्टेरियाही ह्यामुळे नष्ट होतात आणि लिंबाच्या रसामुळे मुरुमाचे डागही कमी होतात.