डोळे येणे यावर उपाय आणि संपूर्ण माहिती, जाणून घ्या...
राज्यातील अनेक जिल्ह्यामध्ये डोळे येण्याची साथ जोरात पसरत आहे. हा आजार संसर्गजन्य असून हा पसरण्याचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसत आहे. डोळ्यासारख्या नाजूक अवयवावर परिणाम करत असल्याने होणारा त्रास हा अधिक असतो. तो बरा व्हायला देखील थोडासा कालावधी लागतो, त्यामुळे डोळे आल्यानंतर योग्य काळजी घेणे हेच अधिक फायदेशीर ठरते. विशेषतः या ऋतूमध्ये जे संसर्गजन्य आजार फोफावतात, त्यामध्ये 'डोळे येणं' हा प्रमुख आहे. ‘डोळे येणे’ याला इंग्रजी मध्ये conjunctivitis म्हटलं जातं. हा एक वेगाने पसरणारा आजार आहे.
डोळे येण्याची लक्षणे काय?
डोळे आले असल्यास काही लक्षणं प्रामुख्याने जाणवू लागतात.
1. डोळे हलके लाल होऊ लागतात.
2. डोळ्यातून पाणी यायला लागतं.
3. खाज येऊ लागते.
4. डोळ्यात थोडी चिकटपणा येतो.
5. डोळ्यात वारंवार खाज येते.
डोळे येण्याची कारणे कोणती?
1. डोळे येण्याचे प्रमुख कारण म्हणजे हवामानातील संसर्ग आणि एलर्जी युक्त घटकांच्या वापरामुळे डोळे येऊ शकतात.
2. डोळे येण्याचे कारण हे डोळे आलेल्या व्यक्तींच्या सहवासात राहिल्यामुळे म्हणजेच त्यांनी डोळ्यांना हाताने स्पर्श करून जर का दुसऱ्या ठिकाणी हात लावला त्यामुळे संसर्ग वाढत जातो किंवा हवेतील कीटकांमुळे होऊ शकतो.
3. डोळे येण्याचा कारण हे एकमेकांच्या वापरल्या जाणाऱ्या वस्तूंमुळे होऊ शकतो. जसे की ब्युटी क्रीम, काजळ किंवा साबण इत्यादी .
4. हवेतील प्रदूषणामुळे किंवा हवेतील धुळीच्या कणांमुळे डोळे येण्याचा संसर्ग होऊ शकतो.
5. एकमेकांचे हात रुमाल ,टॉवेल ,चष्मा वापरल्यामुळे डोळे येण्याचा संसर्ग होऊ शकतो.
डोळे आल्यावर कोणती काळजी घ्यावी?
1. डोळे आल्यावर सतत डोळ्यांना हात लावू नये.
2. डोळे पुसण्यासाठी स्वच्छ कपड्याचा वापर करावा. डोळ्यांना हात लावल्यावर लगेच साबण लावून हात धुवावे.
3. डोळे आल्यावर साधा कोणताही पण स्वच्छ असा चष्म्याचा वापर करावा.
4. धूर, हवा, लाईटचा प्रकाश यांचा सहवास टाळावा.
5. डोळे आल्यावर सार्वजनिक जागेवर जाऊ नये, कारण डोळे येणे संसर्गजन्य असल्यामुळे आपल्याला झालेला संसर्ग दुसऱ्यांना होऊ शकतो. यामुळे सार्वजनिक ठिकाणी जाण्याचे टाळावे.