आयुर्वेदानुसार पाणी पिण्याचे काय नियम आहेत?
वैद्य नमिता आणि मी वैद्य भाग्यश्री
आज आपण आयुर्वेद शास्त्र पाणी पिण्याबद्दल काय म्हणतं ते जाणून घेणार आहोत. लहानपणी वाचलेल्या गोष्टीतले तहान लाडू, भूक लाडू आठवतात का हो तुम्हाला? एखादा लहान मुलगा दूरच्या प्रवासाला निघाला की तो, तहान लागली तर खायला तहान लाडु आणि भूक लागली तर खायला भूक लाडू बरोबर घेऊन निघत असे.
तहान लागली की तहान लाडू खावा हे जे गोष्टीतल्या छोट्या मुलालाही समजत असे, ते सध्या आपल्याला का बरं समजत नसावं? असं म्हणण्याचं कारण हे की आयुर्वेद शास्त्रात अगदी स्पष्ट सांगितलेलं आहे की तहान लागेल तेव्हा आणि तहान शमेल तितक्या प्रमाणातच पाणी प्यावं. उगाचच अमुकलिटर पाणी दिवसभरात पोटात जायलाच हवं असं ठरवून लिटरलिटरच्या बाटल्या भरून ठेवायच्या आणि तहान लागलेली नसतानाही जबरदस्तीने पोटात रित्या करायच्या हे आरोग्याच्या दृष्टीनी हितकारक नाही.
प्रकृती,जीवनशैली, ऋतुमान, मानसिकता या सगळ्यावर आपली तहान ठरत असते. भीतीनीघशाला कोरड पडली असं आपण म्हणतो ते उगाच नाही. पाणी जीवन आहे, आश्र्वस्त करणारं आहे, थकून आलेल्या व्यक्तीला ताजेतवाने करणारं आहे, पण म्हणून त्याचा अतिरेकी वापर करणं योग्य नाही. शरीरात गेलेली प्रत्येक वस्तू, प्रत्येक पदार्थअग्नीकडून पचवला जाणं आवश्यक असतं. अन्नाप्रमाणे पाण्याचे सुद्धा पचन होतं आणि मगच ते घामावाटे किंवा लघवीवाटे शरीराबाहेर पडतं.
अति प्रमाणात पाणी पिण्यानी अपचन, मधुमेह, वजन वाढणं, acidity, migraine इतकंच नाही तर मूत्रपिंडच्या कामात बिघाड होऊन मूत्रपिंड निकामी होण्यापर्यंतचे अनेक त्रास होताना दिसतात. त्यामुळे मंडळी, तहान लागेल तेव्हाच पाणी पिण्याची आणि ते सुद्धा योग्य प्रमाणात पिण्याची सवय असणं चांगलं. तहान नसताना उगाचंच पाणी पिणं किंवा अख्खा 200 ml चा मोठा ग्लास गटागट पिऊन टाकणं हे आज ना उद्या तब्येतीसाठी त्रासदायक ठरणार आहे हे लक्षात ठेवा आणि निरोगी रहा.