Summer Drinks : पाहुण्यांना लिंबू सरबत ऐवजी बनवा 'हा' सरबत
घरी पाहुणे आले की एक प्रश्न हमखास विचारला जातो, गरम घेणार का थंड? याचं उत्तर जर थंड असं आलं, तर आपली पहिली निवड लिंबू सरबत असते. त्यामुळे आज या लेखात जाणून घेणार आहोत, एक ताजेतवाने, तना-मनाला स्फूर्ती देणारे, पण नेहमीच्या लिंबू सरबतापेक्षा थोडसं वेगळं असलेलं लेमन बेसील पंच (Lemon Basil Punch) आहे.
बेसील ही औषधी वनस्पती सध्या इटालियन पाककृतीमुळे भारतातही सर्वांच्या परिचयाची झालेली आहे. पण खरं तर बेसील हा तुळशीचाच एक प्रकार. बर्बरी नावानी काही आयुर्वेदाच्या ग्रंथात ज्या तुळशीचं वर्णन आढळलेल ती बेसील असावी असं वाटतं. बेसीलच्या पानं चवीला अतिशय रूचकर असतात, त्यांचा सुवास खूपच ताजेतवाने असते तुळशीप्रमाणे अगदी सोप्या पद्धतीने बेसील आपण कुंडीमध्ये सुद्धा लावू शकतो. चला तर पाहू यात लेमन बेसील पंच बनवण्याची पद्धत काय आहे?.
दोन ग्लास पंच बनवायचे असेल, तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे, एक मध्यम आकाराचं लिंबू, बेसीलची पाच ते सहा ताजी पानं, खडीसाखर, मीठ आणि जीरे पूड आणि काळी मिरी.
सर्वप्रथम बेसीलची पानं सुरीच्या किंवा कात्रीच्या मदतीनी थोडी बारीक करून घ्यावी. आता एका पातेल्यामध्ये बारीक केलेली बेसील, तीन साडेतीन चमचे खडीसाखरेची पूड, पाव चमचा सैंधव आणि अर्धा चमचा जीऱ्याची पूड, 2 ते ३ चिमूट मीरपूड घ्यावी. वरून एका लिंबाचा रस पिळावा. चमचाच्या मदतीनी हे सर्व मिश्रण नीट मिक्स करून पाच मिनिटांसाठी तसंच झाकून ठेवावं. आता यात दोन ग्लास माठातलं थंड पाणी मिसळावं, पुन्हा एकदा नीट हलवून गाळणीच्या मदतीनी ग्लासमध्ये गाळून घ्यावं. शोभेला म्हणून वरती एक लिंबाची चकती आणि बेसीलचं एक पान टाकावे आणि थोडासा हटके असणारं हे लेमन बेसील पंच छान आनंद घ्या.