Weather Tips : वातावरण बदलांमुळे सर्दी, खोकला होतोय का? त्यावर करा 'हा' उपाय
डॉ. नमिता पारेख, डॉ. भाग्यश्री झोपे
भारतात प्रत्येकांच्या घरी तुळशीचे झाड असते. भारतीय परंपराचे मूळ हे आरोग्य रक्षणात दडलेलं असते, असे श्रीगुरु डॉ बालाजी तांबे नेहमी सांगतात. त्यांनी आयुर्वेदात ऋतुसंधी संदर्भात एक संकल्पना सांगितली होती. एक ऋतु संपून दुसरा ऋतु सुरु होतो त्यावेळेस असलेला मधल्या काळाला ऋतूसंधी असे म्हणतात. एखादी रेल्वेगाडी जर रुळ बदलत असेल तर तिचा खडखड आवाज येतो बरोबर ना? कारण कोणताही बदल सोपा नसतो.
ज्यावेळेस ऋतू बदलतो त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होतो. आपण जर नीट निरीक्षण केलं तर लक्षात येईल की, ऋतूमध्ये बदल झाला की, अनेकांना सर्दी, खोकला, ताप, भूक कमी होणं, तोंडाला चव नसणे असे अनेक त्रास होतात. परंतू आजकाल याकडे फक्त एक संसर्ग (infection)म्हणून पाहिले जाते. त्यासाठी प्रतिजैविक (antibiotics) या सारखी औषधं घेतली जातात. पण या बदलाची लक्षणे जरी कमी असतील तरी, शरीरावराचे असंतुलन असणे चांगले नाही. याशिवाय पोटातील प्रोबायोटिक(probiotic)म्हणजे पचनाला फायदेशीर असणाऱ्या बॅक्टेरियांवर दुष्परिणाम होतो, ज्याचे अनेक दुरगामी परिणाम होणार आहे.
हे सर्व सांगण्याचा उद्देश म्हणजे, ऋतूबदलामुळे जर शिंका, सर्दी, खोकला, ताप असे त्रास जाणवत असतील तर, लवकरात लवकर हा घरगुती काढा तुम्ही बनवू शकता. हा काढा 2 ते 3 दिवस घेतला आणि जरी बरं नाही तर, डॉक्टराचा सल्ला घेऊ शकता.
काढा बनवण्याचे साहित्य
5-6 तुळशीची पानं
2-3 पारिजातकाची पानं
सुंठीचा लहान तुकडा
1-2 वेलदोडे
2-3 मिरी
दालचिनीचा छोटा तुकडा
चमचाभर गोखरूची काटेरी फळ
१ ते २ पिंपळी
एक शतावरी मुळी
एक अश्वगंधाची मुळी
कृती
वरील दिलेले सर्व साहित्य खलबत्याच्या मदतीने थोडं कूटुन घ्या. आता एका पातेल्यामध्ये दोन कप पाण्यात हे सर्व मिश्रण टाका. मध्यम आचेवर अर्धा कप काढा तयार होईपर्यंत आटावावं. तयार झालेला काढा गाळून घ्या. त्यामध्ये थोडी खडीसाखर आणि मध टाकावं. परंतू मध टाकण्यापुर्वी तयार झालेला काढा कोमट आहे का? त्याची खात्री मात्र करावी.
हा काढ्याची विशेषता अशी आहे की, त्रास होत असताना काढा घेतल्यास लगेच बरं वाटते. ज्या व्यक्तींना ऋतुसंधीत सर्दी, खोकला होण्याची प्रवृत्ती आहे. त्यांनी त्रास होण्यापूर्वी प्रतिबंध म्हणून हा उपाय केला तरी चालतो.