Monsoon Health Tips : पावसाळ्यात डेंग्यूपासून बचावासाठी काय खबरदारी घ्याल? जाणून घ्या
भारतामध्ये पावसाळा सुरु झाला की मोठ्या प्रमाणावर रोगराई पसरते. भारतातील ग्रामीण शहरी आणि दाट लोकवस्तीच्या भागात जिथे मोठ्या प्रमाणावर पाणी साचलेले असते तिथे डासांची पैदास जास्त होते आणि त्या द्वारे डेंग्यूची लागण होते. त्यामुळे पावसाळ्यात नागरिकांनी अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. डेंग्यूने अनेक रुग्ण ही दगावतात. त्यामुळे ह्या आजारपासुन बचाव करण्यासाठी योग्य ती खबरदारी राखली गेली पाहिजे.
भारतामध्ये 1963 साली कोलकत्ता मध्ये पहिली मोठी साथ आली होती. त्यामुळे अनेक नागरिक दगावल्याची माहिती समोर आली होती. डेंग्यूचा विषाणू म्हणजेच व्हायरस हा एडिस इजिप्ती ह्या प्रकारच्या डासांमार्फत पसरतो. तसेच डेंगू असलेल्या रुग्णाला चावलेला डास जेव्हा निरोगी व्यक्तीस चावतो तेव्हा त्या व्यक्तीला सुद्धा डेंगूची लागण होते. त्यामुळे पावसाळ्यात डेंग्यू हा रोग होऊ नये म्हणून योग्य ती काळजी घेतली गेली पाहिजे.
प्लेटलेट कमी होणे, बीपी कमी होणे, हात-पाय थंड पडणे, लघवी कमी होणे, पोटात दुखणे , तीव्र ताप येणे , ही डेंग्यू ची प्रमुख लक्षणे आहेत. डेंग्यूचा डास हा दिवसा चावतो. त्यामुळे घरामध्ये किव्हा आजुबाजुला डासांची पैदास होऊ देऊ नका. तसेच कूलर मधील पाणी वारंवार बदलत राहा. घरातील कुंड्या पाण्याच्या बाटल्या यांच्यात पाणी जमा होऊ देऊ नका.
पक्ष्यांसाठी असलेले पाणी सुद्धा वारंवार बदलत राहा. घराच्या बाल्कनीमध्ये किव्हा टेरेसवर पाणी साचू देऊ नका. तसेच घरात मच्छरांचा वावर जास्त होऊ देऊ नका त्यासाठी योग्य ती खबरदारी घ्या. खिडक्यांना जाळी बसवून घ्या. या आजाराविषयी सर्वसामान्य नागरिकांमध्ये जनजागृती होण्याच्यादृष्टीने हा आजार होऊ नये, याकरीता नागरिकांनी आरोग्य विभागाच्यावतीने दिलेल्या सूचनांचे पालन करा.
जर कोणाला आपल्या आजुबाजुला डेंग्यू झाला असेल तर त्वरित त्याला जवळच्या दवाखान्यात न्या. आपल्याला ही डास चावणार नाही याची योग्य ती खबरदारी घ्या. तसेच वरील आजाराची लक्षणे आढळून आली तर लगेचच डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि योग्य त्या उपाययोजना करा.