आज हरतालिकेचे व्रत केले जाते. हे व्रत केल्याने माता पार्वती आणि भगवान शिव यांचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि पतीला दीर्घायुष्य, कीर्ती आणि प्रतिष्ठा प्राप्त होते. विवाहित महिलांसोबतच अविवाहित मुलीही मनपसंत वर मिळण्यासाठी हरतालिकेचे व्रत करतात. माता पार्वती आणि गणेशाचीही पूजा केली जाते.
हरतालिका पूजेची 2023 शुभ वेळ
भाद्रपद शुक्ल तृतीया तिथी सुरू होते - 17 सप्टेंबर, सकाळी 11.08 वा
भाद्रपद शुक्ल तृतीया तिथी समाप्त - 18 सप्टेंबर, दुपारी 12.39 वा.
हरतालिकेच्या पूजेची पद्धत
सकाळी सर्व विधी आटोपल्यानंतर हरितालिका व्रताचा संकल्प करावा. पार्वती आणि तिची सखी यांच्या मातीच्या मूर्तींची चौरंगावर स्थापना करावी. या दिवशी वाळूचे शिवलिंग तयार करून त्याची पूजा केली जाते. हरतालिकेसाठी हिरव्या बांगड्या वाहिल्या जातात आणि विविध प्रकारच्या झाडांची पाने अर्पण केली जातात. या दिवशी दिवसभर कडक उपवास केला जातो. फळांचा नैवेद्य दाखवून देवीची आरती केली जाते. दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा आरती करून नैवेद्य दाखवला जातो. यानंतर मूर्तींचं विसर्जन करून व्रत सोडले जाते.