Mangla gauri vrat 2023 : मंगळागौर का ठेवतात आणि मंगळागौरीची पूजा विधी
मंगळागौर हे हिंदू धर्मातील एक व्रत आहे. ते श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी नवविवाहित महिलेने लग्नानंतर पहिली पाच वर्षे करायचे असते. यासाठी अशाच इतर नवविवाहितांनाही बोलावून सकाळी एकत्रित पूजा करतात व त्यानंतर रात्री जागरण करतात. जागरणाच्या वेळी, विविध खेळ खेळण्याचा प्रघात आहे. खेळांमध्ये परंपरागत चालत आलेली गाणीही म्हणतात - लाट्या बाई लाट्या सारंगी लाट्या, अठूडं केलं गठूडं केलं आदी गाणे म्हणण्यात येतात. नऊवारी लुगडे नेसून व नाकात नथ, पारंपरिक दागिने घालून हे व्रत करण्यात येते.
असे करावे मंगळागौरीचे व्रत विधी
1. सकाळी लवकर उठून स्नान केल्यानंतर सोवळं नेसावे. सोवळं नेसून ही पूजा केली जाते. सर्वप्रथम विघ्नहर्ता गणपतीची पूजा करावी. त्यानंतर लग्नातील अन्नपूर्णेची धातूची मूर्ती चौरंगावर स्थापन करून त्याशेजारी शिवपिंड ठेवावी. नंतर त्यासमोर कणकेच्या दिव्यांची आरास सजवावी. मंगळागौर किंवा अन्नपूर्णेच्या मूर्तीवर शिव-मंगलागौरीचं आवाहन करावं.
2. देवीला विविध झाडांची पाने, फुलं वाहावीत. नंतर तांदूळ, पांढरे तीळ, जिरे, मुगाची डाळ अशा धान्यांची मूठ अर्पण करावी. मंगळागौरीची कहाणी वाचावी. महानैवेद्य अर्पण करावा. 16 दिव्यांनी आरती करावी. यानंतर षोडशोपचार पूजा करताना अखंड सौभाग्य प्राप्ती आणि सर्व मनोकामना पूर्ण करण्या करता देवीला 3 अर्घ्य द्यावीत.
3. मंगळागौरीसाठी महिलांना आमत्रंण द्यावं. त्यांना भोजन, हळदी-कुंकू द्यावं. संध्याकाळी आरती करावी. रात्रभर जागरण करावं. सुवासिनी महिला फुगड्या, झिम्मा, खेळत, गाणी गात मंगळागौर जागवतात.
4. साधी फुगडी, एका हाताची फुगडी, कंबर फुगडी, गुडघ्याची फुगडी, बस फुगडी, भुई फुगडी असं फुगडीचे अनेक प्रकार खेळले जातात. झिम्मा, खुर्ची का मिर्ची, नाच गं घुमा, दोडका कीस, कोंबडय़ाचे तीन-चार प्रकार, सासू-सुनेचं अथवा सवतींचं भांडण असे खेळ रंगतात.
5. अशा प्रकारे आनंदाने हा दिवस साजरा होतो. सलग 5 वर्षे हे व्रत करावं. गेल्यावर्षी कोरोनामुळे नवविवाहितांचा काहीसा हिरमोड झाला होता. पण, यावेळी नियम थोडे शिथिल झाले आहेत, त्यामुळे कमी गर्दीत हा सण साजरा होईल.
6. ‘गौरी गौरी सौभाग्य दे’ अशी प्रार्थना करत आपल्या पतीला निरोगी आणि समृद्ध आरोग्य मिळावे यासाठीही नवविवाहिता प्रार्थना करते.