विश्वचषक टी-२० : आज भारत-पाकिस्तान आमने-सामने
गेल्या ७४ वर्षांत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेटलढतींचे औत्सुक्य मात्र टिकून आहे. भारत-पाकिस्तान यांच्यातील राजनैतिक संबंध बिघडल्यामुळे गेल्या काही वर्षांत उभय संघांमधील सामन्यांची संख्या रोडवली आहे; परंतु 'आयसीसी' ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या निमित्ताने रविवारी दुबईत हे दोन संघ एकमेकांशी भिडणार आहेत.
ट्वेन्टी-२० या क्रिकेट प्रकारात विजयाचे अंतर बऱ्याचदा निसटते असते. त्यामुळेच कोणताही संघ अनपेक्षितपणे बाजी पलटवू शकतो. ट्वेन्टी-२० क्रिकेटमधील आणि या प्रकारातील विश्वचषकाच्या आकडेवारीत भारताचे पारडे पाकिस्तानपेक्षा जड आहे, हेच २००७च्या पहिल्या विश्वचषकापासून सिद्ध झाले आहे. भारताने सर्व सामने महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली जिंकले आहेत. रविवारी विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ बाबर आझमच्या पाकिस्तान संघाशी सामना करणार आहे. त्यामुळे प्रक्षेपणकर्ते, चाहते, जाहिरातदार आदी घटकांनी या सामन्याची चर्चा रंगात आणली आहे.
पाकिस्तान : (अंतिम १२)बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान, फखर जमान, मोहम्मद हाफीज, शोएब मलिक, आसिफ अली, इमाद वसीम, शादाब खान, हॅरिस रॉफ, हसन अली, शाहीन शाह आफ्रिदी, हैदर अली.
भारत : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, के. एल. राहुल, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टिरक्षक), हार्दिक पंड्या, इशान किशन, शार्दूल ठाकूर, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमरा, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, वरुण चक्रवर्ती, राहुल चहर