Navratri 2024: जाणून घ्या महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठे कोणती? आणि त्याच्याबद्दल विशेष माहिती

Navratri 2024: जाणून घ्या महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठे कोणती? आणि त्याच्याबद्दल विशेष माहिती

आश्विन महिन्यात शेतात तयार झालेले नवीन धान्य घरात येते, म्हणून आश्विन महिन्याच्या पहिल्या नऊ दिवसात निर्मितीशक्तीची म्हणजेच आदिशक्तीची उपासना केली जाते.
Published by :
Dhanshree Shintre
Published on

दा. कृ. सोमण, पंचांगकर्ते, खगोल अभ्यासक

सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके ।

शरण्ये त्र्यंबके गौरि नारायणि नमोऽस्तु ते ॥

आश्विन महिन्यात शेतात तयार झालेले नवीन धान्य घरात येते, म्हणून आश्विन महिन्याच्या पहिल्या नऊ दिवसात निर्मितीशक्तीची म्हणजेच आदिशक्तीची उपासना केली जाते. निर्मितीशक्ती आणि नऊ अंक यात अतूट नाते आहे. बी जमिनीत गेले की नऊ दिवसानी अंकुरते. गर्भधारणा झाल्यापासून नऊ महिने, नऊ दिवसांनी मूल जन्माला येते, म्हणून नवरात्र नऊ दिवसांचे असते. हा समृद्धीचा काल समजला जातो. संपूर्ण भारतात 51 शक्तिपीठे आहेत, त्यापैकी साडेतीन शक्तिपीठे महाराष्ट्रात आहेत. देवी भागवतात त्याचा उल्लेख आहे.

कोल्हापुरं महास्थानं यत्र लक्ष्मी सदास्थिता ।

मातु:पुरं द्वितीयं च रेणुकाधिष्ठितं परम् ।

तुळजापुरं तृतीयं स्यात् सप्तशृंग तथैव च ।

या साडेतीन शक्तिपीठांपैकी (कोल्हापूरची) 'श्रीमहालक्ष्मीदेवी' सत्त्वगुणविशिष्ट, मातापूरची (माहूरगडची) 'श्रीरेणुकादेवी' तमोगुणविशिष्ट, (तुळजापूरची) 'श्रीभवानीदेवी' रजोगुणविशिष्ट आणि (वणीची) 'श्रीसप्तशृंग निवासिनी' हे अर्धे शक्तिपीठ मानले जाते.

महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठे म्हणजे ॐकाराचे सगुण रूप समजले जाते. ॐकारामध्ये साडेतीन मात्रा आहेत. 'अ'कार पीठ माहूर, 'उ'कार पीठ तुळजापूर, 'म'कार पीठ कोल्हापूर आणि ऊर्धमात्रा सप्तशृंगी निवासिनी देवीच्या मूळ ठिकाणाचे दर्शन सर्वांना होत नाही म्हणून अर्धपीठ मानले जाते. साडेतीन म्हणजे एक औट! आज यावेळच्या नवरात्रात महाराष्ट्रातील या साडेतीन शक्तिपीठांचे आपण सर्वांनी दर्शन घेऊया.

(1) करवीर निवासिनी श्रीमहालक्ष्मी

श्रीमहालक्ष्मी अंबाबाई मंदिर कोल्हापूर हे महाराष्ट्रात असलेल्या मंदिरांच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी एक जागृत पीठ आहे. करवीरनिवासिनी श्रीमहालक्ष्मी प्रसन्नवदना, कमलासना आणि सुदर्शनचक्र धारण करणारी महिषासूरमर्दिनी आहे. कोल्हापूरच्या अंबाबाईचे हे मंदिर इ.सन 634 मध्ये चालुक्य राजा कर्णदेव याने बांधले. ही हेमाडपंथी वास्तुकला आहे. कोल्हापूरचे हे महालक्ष्मी मंदिर पश्चिमाभिमुख आहे. महाद्वार पश्चिमेकडे आहे. मंदिराचे आवार प्रशस्त असून सर्व बाजूनी बंदिस्त आहे. या मंदिराला चारही दिशाना मोठे दरवाजे आहेत. या मंदिराचे शिल्पसौंदर्य देखणे आहे.

मंदिरातील अंदाजे तीन फूट उंचीच्या काळ्याभोर आरस्पानी शिलासनावर ही आदिशक्ती, जगन्माता श्रीमहालक्ष्मी अंबिका उभी आहे. तिची उंची दोन-अडीच फूट असून ती चतुर्भुज आहे. देवीच्या वरच्या दोन हातांपैकी उजव्या हातामध्ये गदा धारण केली असून डाव्या हातात पुढे केलेली ढाल आहे. खालच्या बाजूच्या उजव्या हातावर मातुलिंग असून डाव्या हातात पानपात्र आहे. मस्तकावरील मुकुटावर देवीने शिवलिंग धारण केलेले असून त्यावर नागफणा आहे. श्रीमहालक्ष्मी अंबाबाई मूर्तीचे सुंदर वर्णन अनेक प्राचीन ग्रंथांमध्ये केले असल्याचे आढळून येते.

मंगळवार आणि शुक्रवार हे देवीचे दिवस मानले जातात. नवरात्रीच्या नऊ दिवसात या मंदिरात मोठा उत्सव असतो. या श्रीमहालक्ष्मी मंदिरातील किरणोत्सव ही एक विलक्षण घटना अनुभवास येते. दरवर्षी 31 जानेवारी, 01, 02 फेब्रुवारी आणि 9/10/11 नोव्हेंबर रोजी देवीच्या मूर्तीला सूर्यकिरणांचा स्पर्श होतो.

(2) माहूरगड निवासिनी श्रीरेणुकादेवी

माहूरची श्रीरेणुकादेवी माता हे महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी एक जागृत पीठ आहे. परशुरामाची माता म्हणूनही श्रीरेणुकामातेला ओळखले जाते. देवीचे हे मंदिर तेराव्या शतकात देवगिरीच्या यादवकालीन राजाने बांधले आहे. माहूरगडावरच श्री दत्तात्रेयांचा जन्म झाला अशीही भाविकांची श्रद्धा आहे.

देवी रेणुकेचे मंदिर मातापूर गावाच्या डोंगर शिखरावर आहे. देवीच्या गाभा-याचा दरवाजा चांदीच्या पत्र्याने मढविलेला आहे. देवीच्या मस्तकावर चांदीचा टोप असून बैठकीवर देवीचे सिंहवाहन आहे. तांदळारूपातल्या मुखाचीच माहूरला पूजा होते. देवीच्या दर्शनााठी येणारी भक्त मंडळी येथे जनविडा, खडीसाखर आणि मिठाई अर्पण करतात. प्रसाद म्हणून कुटलेला विडा आणि मिठाई देण्याची प्रथा आहे. रेणुकामातेच्या मंदिराचा हा परिसर घनदाट जंगलाचा आणि दऱ्याखोऱ्यांचा आहे.

माहूरच्या गडापासून जवळच रामगड हा किल्ला आहे. जवळच कोरीव काम केलेल्या गुहा आहेत. परशुरामाना डोंगरावर मातेचे दर्शन झाले म्हणून याला मातापूर हे नाव प्राप्त झाले. शेजारच्या आंध्रप्रदेशात ऊर म्हणजे गाव ! म्हणून माताचे पुढे माहूर झाले. नवरात्रीमध्ये माहूरगडला श्रीरेणुकादेवीचा मोठा उत्सव साजरा केला जातो.

स्कंदपुराणात ‘सह्याद्रिखंड‘ आणि ‘कालिकाखंड‘ या दोन विभागातून ‘रेणुका माहात्म्य‘ आणि 'माहूरग्राम महिमा‘ यांची माहिती आली आहे. भगवान श्रीविष्णूच्या आज्ञेवरून ब्रह्मदेव सृष्टीची रचना करण्यासाठी प्रवृत्त झाले. त्यांना मार्गदर्शन व्हावे म्हणून विष्णूनी एक आदर्श स्थान अगोदर निर्माण केले तेच माहूर क्षेत्र होय अशी पौराणिक कथा सांगितली जाते.

(3) तुळजापूरवासिनी श्रीभवानीदेवी

महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी तुळजापूरवासिनी श्रीभवानीदेवी हे एक पूर्ण जागृत शक्तिपीठ आहे. महाराष्ट्र क्षात्रतेजाची स्फूर्तीदेवता, प्रेरणाशक्ती आणि स्वराज्य संस्थापक छत्रपती श्रीशिवाजी महाराज यांची आराध्यदेवता अशी ही तुळजापूरची भवानीदेवी ही महाराष्ट्राची कुलस्वामिनी आहे.

पुरातत्त्वदृष्ट्या हे मंदिर राष्ट्रकुट अथवा यादवकालीन मानले जाते. मंदिराच्या परिसरातील कल्लोळतीर्थ, गोमुखतीर्थ, श्रीसिद्धिविनायक मंदिर , श्री भवानी शंकर मंदिर, होमकुंड इत्यादी धार्मिक स्थळे प्रसिद्ध आहेत. इतरत्र नवरात्रीचा उत्सव नऊ दिवसांचा असला तरी तुळजापूरला मात्र नवरात्रीचा उत्सव एकवीस दिवस चालत असतो. भवानीदेवी ही केवळ महाराष्ट्राचीच नव्हे, तर अखिल भारतीयांची आराध्यदेवता आहे.

भवानीदेवीची मूर्ती गंडकी शिळेची असून अतिशय सुंदर, रेखीव आणि प्रमाणबद्ध आहे. ती अष्टभुजा आहे. महिषासुरमर्दिनी आहे. मूर्तीच्या उजव्या आणि डाव्या खांद्याजवळ अनुक्रमे चंद्र आणि सूर्य यांच्या आकृत्या आहेत. आठ हातांपैकी सहा हातात निरनिराळी शस्त्रे असून राहिलेल्या दोन हातांपैकी एकाने महिषासुराची शेंडी धरलेली आहे आणि दुसऱ्या हाताने त्याच्या बरगडीत भाला खुपसलेला दाखविला आहे. पायाखाली रेड्याच्या रूपात महिषासुर दाखविलेला आहे.

देवीचा गोंधळ घालण्याची प्रथा फार जुनी आहे.भवानी आईच्या भक्तीचा प्रसार गोंधळी लोकांनी खूप प्रभावीपणे केला आहे. ते भक्तीचा आणि ज्ञानाचा प्रसार करीत असतात. संत एकनाथांनी आपल्या भारुडात गोंधळ घातलेला आहे. त्यांची कुलदेवता भवानीमाताच होती. महाराष्ट्राच्या पराक्रमाची जोपासना करणारी तुळजा भवानी ही एक प्रभावी शक्तिदेवता आहे.

(4) सप्तशृंग निवासिनी श्रीजगदंबा

नाशिक जवळील नांदुरी गावाजवळ सप्तशृंगी हा महाराष्ट्रातील एक किल्ला असून अनेकांची आराध्यदैवत असणा-या सप्तशृंगी देवीचे तीर्थक्षेत्र आहे. महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन शक्तिपीठातील हे एक अर्धपीठ मानले जाते. ब्रह्मदेवाच्या कमंडलूपासून निघालेल्या गिरिजा महानदीचे रूप म्हणजे सप्तशृंगीदेवी मानले जाते. देवीचे अठराभुजा सप्तशृंग रूप येथे दर्शन देते. ही देवीची स्वयंभू मूर्ती आहे. येथील गाभा-याला शक्तिद्वार, सूर्यद्वार आणि चंद्रद्वार असे तीन दरवाजे आहेत.विशेष म्हणजे या तीनही दरवाजातून देवीचे सुंदर दर्शन घडते.

सप्तशृंगी देवीची मूर्ती आठ फूट उंचीची आहे. ती शेंदुराने लिंपली आहे.डोक्यावर सोन्याचा मुकुट, कर्णफुले, नथ आहे. गळ्यात मंगळसूत्र आणि पुतळ्यांचे गाठले आहे. कमरपट्टा आणि पायात तोडे असे देवीचे अलंकार आहेत. नवरात्रात याही देवीमंदिरात मोठा उत्सव असतो. शक्ति-तंत्रकारांनी चित्-शक्तीला ‘चैतन्य‘ असे नाव दिले. मुख्य शक्तीला परा-शक्ती असे म्हटले आहे. हीच शक्ती अखिल विश्वातील हालचालीची सूत्रचालक आहे. तिलाच आद्य-शक्ती, आदिशक्ती,जगत्जननी, जगदंबा, दुर्गामाता असे म्हणतात. महाराष्ट्रातील ही साडेतीन शक्तिपीठे अनेक पिढ्यांना कार्य करण्यासाठी ऊर्जा प्राप्त करून देत आहेत.

या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता ।

नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमोनम: ॥

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com