Headache Relief: वारंवार डोकेदुखीचा त्रास? औषध घेण्याआधी 'ही' कारणे जाणून घ्या
आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत डोकेदुखी ही समस्या सर्वसामान्य झाली आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेकजण वारंवार डोकेदुखीने त्रस्त असल्याचे दिसते. डोके दुखू लागले की लगेच वेदनाशामक औषध घेण्याकडे अनेकांचा कल असतो. मात्र डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय सतत औषधे घेणे आरोग्यासाठी अपायकारक ठरू शकते. त्यामुळे डोकेदुखीमागची खरी कारणे समजून घेणे आवश्यक आहे.
आरोग्यतज्ज्ञांच्या मते, दैनंदिन जीवनातील काही छोट्या चुका डोकेदुखीला कारणीभूत ठरतात. त्यापैकी एक महत्त्वाची चूक म्हणजे नाश्ता टाळणे. सकाळी नाश्ता न केल्यास रक्तातील साखरेची पातळी कमी होते आणि त्यामुळे अचानक डोकेदुखी होऊ शकते. वेळेअभावी किंवा वजन कमी करण्याच्या नादात नाश्ता टाळणाऱ्यांची संख्या वाढत आहे.
तणावपूर्ण जीवनशैली हे देखील डोकेदुखीचे मोठे कारण आहे. सततचा मानसिक दबाव, कामाचा ताण आणि चिंता यामुळे मान व डोक्याचे स्नायू ताणले जातात. यामुळे तणावजन्य डोकेदुखी उद्भवते. दीर्घकाळ संगणक किंवा मोबाईलचा वापर करणाऱ्यांमध्ये हा त्रास अधिक दिसून येतो.
याशिवाय पुरेसे पाणी न पिणेही डोकेदुखीला आमंत्रण देणारे ठरते. शरीरात पाण्याची कमतरता झाली की डिहायड्रेशन होते आणि त्यामुळे डोकेदुखी, थकवा जाणवतो. वजन कमी करण्यासाठी उपवास करणे किंवा दीर्घकाळ उपाशी राहणे हेही डोकेदुखीचे कारण ठरू शकते. वारंवार डोकेदुखी होत असल्यास औषधांवर अवलंबून न राहता आहार, झोप आणि जीवनशैलीत बदल करणे गरजेचे आहे. तरीही त्रास कायम राहिल्यास तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचे ठरते.
