लहान मुलांना 'काजळ' लावणं ठरु शकते घातक? जाणून घ्या
भारतात जेव्हा एखादे मूल घरात जन्माला येते तेव्हा त्याला वाईट नजरेपासून वाचवण्यासाठी काजळ लावले जाते. तुमच्या घरातील महिलांनी लहान मुलांना काजळ लावताना अनेकदा पाहिलं असेल. आता प्रश्न पडतो की मुलांना काजळ लावणे सुरक्षित आहे का? याचा त्यांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो का? जाणून घ्या...
वास्तविक, काजळ बनवण्यासाठी शिशाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. शिसे हा एक हानिकारक घटक आहे, ज्याचा बाळाच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. किडनी, अस्थिमज्जा, मेंदू यासह शरीराच्या अनेक अवयवांवर याचा विपरीत परिणाम होतो. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की रक्तातील शिशाची पातळी वाढल्यास कोमात जाण्याची शक्यता असते. मूल लहान असल्याने आणि त्याचे शरीर अद्याप विकसित होत असल्याने, प्रत्येक पालकाने त्याला शिशाच्या संपर्कात आणणे टाळले पाहिजे.
मुलांना काजळ का लावू नये?
नवजात बालकांना काजळ लावल्याने त्यांच्या डोळ्यांच्या आरोग्यावर परिणाम होतो. डोळ्यातून पाणी येऊ शकते. खाज येऊ शकते. काही मुलांना यामुळे अॅलर्जी देखील होऊ शकते. अनेक माता आपल्या मुलांना काजळ स्वतःच्या हाताने लावतात. यामुळे डोळ्यांच्या संसर्गाचा धोका वाढू शकतो. बाजारात मिळणाऱ्या काजळांचा वापर लहान मुलांवर अजिबात करू नये. कारण त्यामध्ये अनेक प्रकारचे हानिकारक रसायने समाविष्ट असतात, ज्यामुळे डोळ्यांसह शरीराच्या अनेक भागांना वाईटरित्या नुकसान होऊ शकते.
घरी बनवलेले काजळ लावू शकतो का?
घरी बनवलेले काजळ लहान मुलांना लावता येते असा अनेकांचा समज आहे. कारण ते नैसर्गिक आहे आणि त्यामुळे कोणतेही नुकसान होत नाही. तुम्हीही आत्तापर्यंत तुमच्या मुलाला घरी बनवलेले काजळ लावत असाल तर जाणून घ्या, असे करणे मुलाच्या आरोग्यासाठी चांगले नाही. बाजारातून खरेदी केलेली काजळ असो की घरी बनवलेली असो, दोन्हीमुळे मुलांच्या डोळ्यांना आणि एकूणच आरोग्याला हानी पोहोचते. यामुळे डोळ्यांना संसर्ग, वेदना, जळजळ, खाज सुटणे, लालसरपणा आणि इतर अनेक समस्या उद्भवू शकतात.