Margashirsha Guruvar 2024: यंदा मार्गशीर्ष गुरवार किती? जाणून घ्या तारीख , कधीपासून सुरु होणार मार्गशीर्ष व्रत
मराठी कालनिर्णयानुसार नववा महिना म्हणजे मार्गशीर्ष. हिंदू धर्मात वर्षातील सर्व 12 महिने असून सर्व महिने कोणत्या ना कोणत्या देवतेला समर्पित आहेत. त्याप्रमाणेच मार्गशीर्ष महिना हा भगवान विष्णूंचा सर्वात आवडता महिना असल्याचं पौराणिक आणि धार्मिक मान्यतेनुसार मानले जाते. त्यामुळे असं मानले जाते मार्गशीर्षमध्ये केले जाणारे महालक्ष्मीचे व्रत जे आपल्या घरी भाव भक्तीने करतात त्यांच्यावर माता लक्ष्मीसह भगवान विष्णूंचा देखील आशीर्वाद मिळतो.
यंदा मार्गशीर्षचे 4 गुरुवार असून मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात 2 डिसेंबरपासून होत आहे. आपल्या कुटुंबाला धन- धान्य- समृद्धी मिळावी आणि कुटुंबातील सदस्यांना उत्तम आरोग्य लाभावे या हेतूने सुवासिनी महिला हे व्रत करतात. त्यामुळे या महिन्यातील गुरुवारी मार्गशीर्ष व्रताला महत्तव आहे. मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारपासून हे व्रत सुरु केले जाते आणि यंदाचा पहिला गुरुवार हा 5 डिसेंबरपासून सुरु होत आहे. तर दुसरा मार्गशीर्ष गुरुवार 12 डिसेंबर आहे तर 19 डिसेंबर ला तिसरा मार्गशीर्ष गुरुवार आहे आणि 26 डिसेंबरला शेवटचा गुरुवार असणार आहे. तर शेवटच्या गुरुवारी व्रताचे उद्यापन केलं जाईल.
मार्गशीर्ष व्रतासाठी पूजा विधी
मार्गशीर्ष व्रताची पूजा विधी करताना पहिल्या गुरुवारपासून व्रताला सुरुवात करावी यासाठी पहिल्या गुरुवारी तसेच प्रत्येक गुरुवारी एका चौरंगाखाली सुंदर रांगोळी काढून त्यावर चौरंग मांडून त्यावर तांदूळ किंवा गहू पसरून त्यावर कलश ठेवावा. त्या कलशात हळद कुंकू वाहून, एक नाणं टाकवे तसेच सुपारी आणि आक फुल कलशात अर्पण करावे. यानंतर कलशात पाणी भरून त्यावर हळद आणि कुंकवाचे पाच बोटे उमटवावी आणि त्यात आंब्याची पाने तसेच लावावी, त्यावर नारळ ठेवावा.
नारळाला देवी लक्ष्मीचा मुखवटा लावून त्या कलशाला दागिने, गजरा, पोशाख घालून देवीचा साजश्रृंगार करावा. पूजा झाल्यानंतर देवीचे महात्म्य आणि कथा यांचे वाचन करावे. देवीची आरती करावी. गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवावा. तसेच देवीला नैवेद्य दाखवावा हा नैवद्य दुसऱ्या दिवशी घटाचे उद्यापन करताना एखाद्या गायीला किंवा मुक्या प्राण्याला खाऊ घालावा आणि त्याचे आशिर्वाद घ्यावे. असचं चार गुरुवारी देवीचे व्रत करावे तर शेवटच्या गुरुवारी व्रताचे उद्यापन करावे. सुवासिनींना बोलावून हळदी-कुंकू करावे. मनातील सर्व इच्छा पूर्ण करण्याच्या हेतूने मार्गशीर्ष गुरुवारचे हे व्रत करण्याची पद्धत आहे.
व्रताचे महत्त्व
गुरुवारी व्रत साधल्याने पापांचं नाश होते आणि जीवनात धन, सुख, समृद्धी येते.
लोक गणेश पूजा, विष्णू पूजा, पितृ पूजन आणि महागणपती व्रत करतात.