Prada's Safety Pin : सेफ्टी पिन की लक्झरी फॅशन? प्राडाचा नवा प्रयोग; एका पिनची किंमत तब्बल 68 हजार रुपये!
थोडक्यात
सेफ्टी पिन की लक्झरी फॅशन? प्राडाचा नवा प्रयोग
एका पिनची किंमत तब्बल 68 हजार रुपये!
साध्या पिनचा 'हाय-फॅशन' अवतार
फॅशन जगतात सध्या एका साध्या वस्तूने मोठी खळबळ उडवली आहे. कारण ही वस्तू म्हणजे काही ब्रँडेड बॅग, शूज किंवा घड्याळ नाही, तर एक साधी सेफ्टी पिन! मात्र ही सेफ्टी पिन बनवली आहे जगातील प्रसिद्ध फॅशन ब्रँड प्राडा (Prada) यांनी, आणि तिची किंमत ऐकून अनेकांच्या डोळ्यात अक्षरशः धक्का बसला आहे तब्बल 775 डॉलर, म्हणजेच जवळपास 68,758 रुपये!
साध्या पिनचा 'हाय-फॅशन' अवतार
आपल्या घरात सहज मिळणारी ही पिन अनेकदा बांगड्या, साड्या, किंवा दैनंदिन वापरातील कपड्यांमध्ये अडकवलेली दिसते. काही रुपयांत मिळणारी ही पिन आता ‘लक्झरी अॅक्सेसरी’ म्हणून सादर करण्यात आली आहे. प्राडाची ही सेफ्टी पिन ब्रोच सोन्याच्या रंगात असून, त्यावर रंगीबेरंगी धाग्याचा छोटा आकर्षक चार्म बांधलेला आहे. ही डिझाईन इतकी साधी आहे की ती पाहून “यासाठी इतकी किंमत का?” असा प्रश्न प्रत्येकाला पडतो. कारण यात कुठलाही हिरेजडित डिझाईन, मौल्यवान धातू किंवा रत्न नाही फक्त एक स्टायलिश पिन!
सोशल मीडियावर प्रचंड चर्चेचा विषय
या ‘सेफ्टी पिन ब्रोच’ची झलक इंटरनेटवर येताच, सोशल मीडियावर लोकांनी ताशेरे ओढायला सुरुवात केली. फॅशन इन्फ्लुएन्सर ब्लॅक स्वान साझी (Black Swan Sazy) हिने इंस्टाग्रामवर व्हिडिओ टाकत म्हटलं, “श्रीमंत लोकांनो, जर तुम्हाला तुमच्या पैशाचं काय करावं समजत नसेल, तर बाकी लोकांकडे चांगल्या कल्पना आहेत!” हा व्हिडिओ व्हायरल होताच, नेटिझन्सनीही प्राडाच्या या ‘नवनवीन शोधा’वर जोक्सचा वर्षाव केला. कुणी लिहिलं “आपल्या आईच्या साड्यांवर लागणारी तीच पिन आता लाखात विकली जातेय!” तर कुणी म्हणालं “आपल्याकडे 20 रुपयांत मिळणारी वस्तू प्राडाच्या टॅगने 68 हजारांची झाली, हेच फॅशनचं सोनं!”
‘मिनिमल लक्झरी’चा नवा ट्रेंड
फॅशन क्षेत्रातील तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, प्राडा या माध्यमातून ‘मिनिमल लक्झरी’ म्हणजेच साधेपणातही श्रीमंती असा नवा ट्रेंड पुढे आणत आहे. रोजच्या वापरातील वस्तूला उच्च दर्जाचं डिझाईन देऊन त्यातून ब्रँड व्हॅल्यू तयार करण्याचा हा प्रयत्न आहे. मात्र सर्वसामान्य ग्राहकांसाठी ही गोष्ट अजूनही आश्चर्यकारक आहे. कारण ज्या वस्तूचा उपयोग साध्या कपड्यांना शिवण्यासाठी किंवा सुरक्षित ठेवण्यासाठी होतो, त्याच वस्तूला जवळपास 70 हजार रुपयांची किंमत लावणे हेच लोकांना हसवणारं आणि थक्क करणारं आहे.
साधेपणातून श्रीमंतीचा प्रयोग की अतिचमकदार मार्केटिंग?
या पिनमुळे पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे की, ब्रँडच्या नावावर ग्राहक किती पैसा खर्च करण्यास तयार असतात. प्राडाचा हा ब्रोच लक्झरी जगतात नक्कीच लक्षवेधी ठरला आहे, पण सर्वसामान्यांसाठी तो केवळ एक ‘महागडा विनोद’ ठरत आहे.
थोडक्यात सांगायचं तर,
फॅशनच्या दुनियेत आता साधी सेफ्टी पिनही “गोल्ड क्लास”मध्ये पोहोचली आहे आणि तिची किंमत ऐकून लोक म्हणतायत, “हे सोनं नाही, हे प्राडाचं कमाल आहे!”
