मेहेंदीचा रंग खुलवण्यासाठी प्रयत्न करताय? मग ही बातमी तुमच्यासाठी
कोणताही सण असो वा फंक्शन, मुली आणि महिलांना मेहंदी लागतेच. मेहेंदी म्हणजे महिलांचा आवडता विषय. आपलीच मेहंदी सर्वात गडद कशी दिसेल यासाठीही खूप सारे उपाय केले जातात. त्यात लग्न असेल तर मग मेहंदीचा रंग खुलायलाच हवा. कोणताही महत्वाचा सण किंवा कार्यक्रम या मेहंदीशिवाय अपूर्ण वाटतो ना? लग्नसोहळयात तर मेहंदीचा दरवळ सोहळ्याला चार चाँद लावतात. जिची मेहंदी जास्त रंगेल तिच्या पतीचे तिच्यावर तेवढे जास्त प्रेम असेल, असेही म्हटले जाते म्हणून हा मेहंदीचा रंग जास्तीत जास्त गडद दिसावा म्हणून प्रयत्न केले जातात.
परंतु, अनेकदा मेहेंदी विक्रेते यासाठी वेगवेगळ्या केमिकलचा वापर करतात. मात्र, या केमिकलमुळे आपल्या हातांना इजा होऊ शकते, असा विचार तुम्ही कधी केलाय का? तर हो, मेहेंदी रंगण्यासाठी अतिरिक्त केमिकलचा वापर केला जातो आणि याच केमिकलमुळे आपल्या त्वचेला इन्फेक्शन होण्याची भीती असते. असाच एक व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
या व्हिडीओमध्ये असं दिसतंय की, एका नवरीनं मोठ्या हौशीनं लग्नासाठी मेहेंदी लावली. मात्र, त्या मेहेंदीमुळे तिच्या त्वचेला इजा झाली. तिच्या हाताच्या मागच्या त्वचेला केमिकेलमुळे जखम झाली असून हातावर पांढरा डागही आलेला दिसतोय. त्यामुळे मेहेंदी खरेदी करताना तपासून घेणे किंवा एखाद्या मेहेंदी आर्टिस्टचा सल्ला घेणे गरजेचं आहे. संवेदनशील किंवा नाजूक त्वचा असणाऱ्या महिलांनी आपली मेहेंदी खरेदी करण्यापूर्वी मेहेंदी तपासून घेणे आवश्यक आहे. मेहेंदी विकत घेताना त्याचा ब्रँड तपासला पाहिजे. तसेच, लोकल मार्केटमधून मेहेंदी खरेदी करण्याऐवजी एखादा विश्वासार्ह मेहेंदी ब्रँड खरेदी केला पाहिजे.
मेहेंदी तपासून घेणे आवश्यक :
टिन खुवाटीन या पेजवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय. कोणतीही मेहेंदी लावल्यानं आपल्याला इजा होऊ शकते. त्यामुळे मेहेंदी विकत घेताना ती तपासून पाहणे महत्त्वाचे आहे, असे यातून सांगण्याचा प्रयत्न केलाय. एका नवरीनं तिच्यासोबत घडलेला प्रकार इतर कोणासोबत घडू नये यासाठी हा व्हिडीओ पोस्ट केलाय. यातीन सर्व महिलांना मेहेंदी लावण्यापूर्वी ती तपासून घेण्याचे आवाहन करतेय.
मेहेंदी रंगण्यासाठी करा हे घरगुती उपाय :
मेहेंदी काढल्यानंतर एका विशिष्ट वेळापर्यंत ती सुकून दिली पाहिजे. मेहेंदी संपूर्णपणे सुकल्यानंतर त्याला पाणी लागणार नाही याची काळजी घ्यावी. मेहेंदी सुकल्यानंतर हातांना प्लॅस्टिक पिशवी लावल्याने मेहेंदी पुसण्याची भीती राहत नाही. मेहेंदी रंगण्यासाठी विशिष्ट कालावधी जावा लागतो. त्यामुळे मेहेंदी लगेच धुतल्यानं आपल्याला हवा तसा गडद रंग येणार नाही. ज्यांच्या शरीरात उष्णता जास्त असते. त्यांच्या हातावर मेहेंदीचा रंग अधिक गडद होतो. मात्र, ज्यांच्या शरीरात उष्णता नसते अशा महिलांनी केमिकल मेहेंदी लावण्यापेक्षा काही घरगुती उपाय केले पाहिजेत.
लवंगीची धुरी :
मेहेंदी संपूर्ण सुकल्यानंतर तवा गरम करुन त्यावर लवंग टाकणे आणि आपल्या मेहेंदीच्या हातांना हलक्या हलक्या पद्धतीनं शेक द्या. लवंगीची वाफ मेहेंदीला लागली पाहिजे. अशा प्रकारे आपल्या दोन्ही हातांना लवंगीचा शेक दिल्यानं उष्णता मिळते आणि हो! लवंग धूर मेहंदीच्या रंगाला दीर्घकाळपर्यंत टिकवतो, यामुळे आपल्या त्वचेलाही कुठल्या प्रकारचा त्रास होत नाही.

निलगिरीचं तेल : मेहंदी काढण्यापूर्वी सर्वात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा की, तुम्ही तुमचे हात पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर तुम्ही तुमच्या हाताच्या तळव्यावर नीलगिरी तेल लावा अथवा तुम्ही मेहंदीच्या तेलाचाही प्रयोग करू शकता. यामुळे तुमच्या हातावरील मेंदी अधिक गडद होण्यास मदत मिळते. साखर पाणी : मेहेंदी काढायला बऱ्यापैकी वेळ लागतो. एवढा वेळ एका जागी बसणे सोपं नाही. अशावेळी आपली चुळबुळ सुरु होते आणि एका जागी बसून आपणं अवघडतो. त्यातच मेहेंदी खराब होण्याची शक्यता असते. मेहेंदी काढताना मधल्या वेळेत आपलं खाणं-पिणंही सुरु असतात. अशावेळी मेहेंदी खराब होऊ नये, पुसू नये म्हणून साखरेचं पाणी आपण मेहेंदीला लावू शकतो. साखर पाण्यात लिंबाचा रस मिसळून तो मेहंदी काढून झाली की थोड्या थोड्या वेळाने मेहंदीवर लावावा. साखरेच्या पाण्यानं मेहेंदी हाताला चिकटून राहते. आणि दिर्घकाळ मेहेंदी हातावर राहिल्यानं ती पुसत नाही.
अलीकडेच अनेक आर्टिस्ट मेहेंदी झटपट सुकण्यासाठी ड्रायरचा वापर करतात किंवा ड्रायर वापरण्याचा सल्ला देतात. मात्र असं न करता संयम बाळगा. ड्रायरचा वापर केल्यानं मेहेंदी निघू शकते आणि त्यामुळे मेहेंदीचा रंग येत नाही. मेहंदी नैसर्गिक स्वरूपातच सुकू द्यावी तरच त्याचा रंग हातावर व्यवस्थित चढू शकतो. सर्व घरगुती उपाय करण्याआधी आपल्या जवळच्या मेहेंदी आर्टिस्टचा सल्ला नक्की घ्या.