Margashirsha 2023 : कधी सुरू होतोय मार्गशीर्ष महिना? जाणून घ्या गुरुवारच्या व्रताचं महत्त्व आणि विधी
मराठी वर्षामधील नववा महिना म्हणजे मार्गशीर्ष. मार्गशीर्षातील प्रत्येक गुरुवार हा सवाष्ण महिलांसाठी विशेष असतो. या दिवशी वैभव लक्ष्मी किंवा महालक्ष्मीचे व्रत करून कुटुंबाला समाधान, शांती, ऐश्वर्य मिळावे, अशी प्रार्थना केली जाते. या व्रताच्या दिवशी वैभवलक्ष्मी घट स्थापन करून शास्त्रोक्त पूजा केली जाते तर शेवटच्या गुरुवारी व्रताचे उद्यापन केले जाते.
यंदा मार्गशीर्ष महिना कधी सुरू होईल?
पंचांगानुसार 12 डिसेंबरला संध्याकाळी 6.24 वाजता अमावस्या संपणार आहे. त्यानंतर 13 डिसेंबरपासून मार्गशीर्ष महिना सुरूवात होणार असून 11 जानेवारीला संध्याकाळी 5:27 वाजेपर्यंत असणार आहे. यावर्षी मार्गशीर्ष महिन्यातील 4 गुरुवार हे महालक्ष्मी व्रत करायचं आहे.
मार्गशीर्ष महिन्याचे महत्त्व
प्राचीन धार्मिक ग्रंथांनुसार मार्गशीर्ष महिना धार्मिक कार्यांसाठी विशेष मानला गेला आहे, म्हणून हा महिना अतिशय शुभ मानला जातो. या महिन्यापासून सत्ययुग सुरू झाले, असेहे म्हटले जाते. त्यामुळे या महिन्यात उपासनेसारखे शुभ कार्य अधिक फलदायक ठरते. मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत पाळले जाते. असे म्हटले जाते की, मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत करून देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूची पूजा केल्याने भक्तांना लक्ष्मी-नारायणाचा आशीर्वाद प्राप्त होतो. लक्ष्मीदेवीच्या कृपेने सुख, समृद्धी आणि संपत्ती येते. नवविवाहित जोडपेही या दिवशी लक्ष्मी-नारायणाचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी उपवास करतात.
जाणून घेऊया गुरुवार महालक्ष्मी व्रत पूजेची पद्धत:
- सर्वप्रथम सकाळी उठून सर्व कामे उरकून, आंघोळ करून स्वच्छ कपडे घाला.
- श्रीगणेशाचे आणि माता लक्ष्मीचे ध्यान करा आणि व्रत-उपासनेचा संकल्प करा. चौरंगावर स्वच्छ लाल किंवा पिवळे वस्त्र ठेवून त्यावर लक्ष्मीची मूर्ती स्थापित करा.
- यानंतर कलशात पाणी भरून त्यात सुपारी, दुर्वा, अक्षता आणि नाणे टाकावे.
- आता कलशावर पाच विड्याची,आंब्याची किंवा अशोकाची पाने ठेवून त्यावर नारळ ठेवा.
- नंतर काही तांदूळ चौरंगावर पसरवा आणि त्यावर कलश स्थापित करा.
- आता हळद-कुंकू आणि फुलांचा हार अर्पण करून कलशाची पूजा करा.
- त्यानंतर देवीच्या मूर्तीला हळद आणि कुंकू लावून सजवा.
- फुले, हार, अगरबत्ती आणि गोड पदार्थाचा नैवेद्य अर्पण करून लक्ष्मीची पूजा करा.
- देवी लक्ष्मीला प्रसाद म्हणून मिठाई, खीर आणि फळे अर्पण करा.
- व्रताच्या दिवशी महालक्ष्मी व्रताची कथा वाचा किंवा ऐका. देवी लक्ष्मीच्या मंत्रांचा जप करा.
- व्रताची कथा संपल्यानंतर देवी लक्ष्मीची आरती करून सर्वांना प्रसाद वाटा.