Dussehra : दसरा सण कशामुळे साजरा होतो?

Dussehra : दसरा सण कशामुळे साजरा होतो?

साडेतीन मुहुर्तांपैकी एक म्हणजे दसरा. हिंदू धर्मातील सर्वात महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्यांपैकी एक सण म्हणजे दसरा. दसऱ्याला विजयादशमी असं सुद्धा म्हणतात. आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील दहाव्या दिवशी (Dussehra) दसरा सण साजरा केला जातो.
Published by :
Team Lokshahi
Published on

थोडक्यात

  • हिंदू धर्मातील सर्वात महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्यांपैकी एक सण म्हणजे दसरा

  • आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील दहाव्या दिवशी दसरा सण साजरा केला जातो

  • यादिवशी सोनं चांदीचे दागिने खरेदी करण्याला विशेष महत्त्व असते

साडेतीन मुहुर्तांपैकी एक म्हणजे दसरा. हिंदू धर्मातील सर्वात महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्यांपैकी एक सण म्हणजे दसरा. दसऱ्याला विजयादशमी असं सुद्धा म्हणतात. आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील दहाव्या दिवशी (Dussehra) दसरा सण साजरा केला जातो. वाईटावर चांगल्याच्या विजयाचं प्रतीक म्हणून हा सण साजरा केला जातो. पण त्याचबरोबर नाती जपण्याचा आणि सोन्यासारखी माणसं जोडण्याचा एक उत्सव म्हणूनही याकडे पाहिले जातं.

धार्मिक मान्यतांनुसार, दसऱ्याच्या सणामागे दोन प्रमुख कारणे सांगितली जातात. पहिले कारण म्हणजे भगवान रामाने याच दिवशी रावणाचा वध केला होता. दुसरे कारण म्हणजे आई दुर्गा देवीने महिषासुर राक्षसासोबत चाललेल्या १० दिवसांच्या युद्धात महिषासुराचा संहार केला होता. दसरा हा सण देश-विदेशात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

दसऱ्याच्या निमित्ताने महाराष्ट्रात ठिकठिकाणी आपट्याची पाने सोने म्हणून एकमेकांना दिली जातात. त्यानंतर सरस्वती पूजन व शस्त्रपूजा देखील केली जाते. यादिवशी सोनं चांदीचे दागिने खरेदी करण्याला विशेष महत्त्व असते. दसऱ्याच्या या मंगलमय दिनाच्या निमित्ताने सर्वजण नातेवाईकांना, मित्र-मैत्रिणींना आणि प्रियजनांना शुभेच्छा देत असतात. आज आम्ही तुम्हाला त्या निमित्ताने तुमच्या खास व्यक्तींना शुभेच्छा पाठ्वण्यासाठी काही खास शुभेच्छा देत आहोत. तुमचे प्रियजनही या शुभेच्छा वाचून तुमच्यासह आनंदी होतील.

आई-वडील आणि प्रिय नातेवाईकांसाठी

तुमच्या आशीर्वादाने माझ्या जीवनात नेहमी आनंद नांदतो. तुमचे आयुष्य यशाने भरून जावो. आई-वडिलांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!

नात्यांमधील गोडवा सोन्यासारखा टिकावा, हीच दसऱ्याच्या पवित्र दिवशी इच्छा. सर्व नातेवाईकांना शुभेच्छा!

माझ्या लाडक्या दादा/भावाला (आणि दीदी/बहिणीला): तुझ्या प्रत्येक प्रयत्नात तुला विजय मिळो! तुमच्या आयुष्यात नेहमी आनंदाचा वर्षाव होवो. दसरा मुबारक!

आपट्याच्या पानांसारखा आपले नातेसंबंधांचा ठेवा सदैव अमूल्य राहो. संपूर्ण कुटुंबाला दसऱ्याच्या शुभेच्छा!

तुमच्या घरात सदैव सुख-समृद्धीचा वास असो, आरोग्य चांगले राहो! यंदाचा दसरा तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करणारा आणि नवीन संधी घेऊन येणारा असो. शुभ विजयादशमी!

उत्सव आला विजयाचा, दिवस सोनं लुटण्याचा, नवं जुनं विसरून सारे, फक्त आनंद वाटण्याचा. विजया दशमीच्या हार्दिक शुभेच्छा!

निसर्गाचं दान आपट्याचं पान, त्याला सोन्याचा मान, तुमच्या आयुष्यात नांदो सुख-शांती समाधान. दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!

पहाट झाली दिवस उजाडला, आला आला सण दसऱ्याचा आला, अंगणी रांगोळ्या, दारात तोरणं, उत्सव हा प्रेमाचा सोनं घ्या सोनं. आपणास व आपल्या परिवारास, विजयादशमी दसऱ्याच्या मंगलमय शुभेच्छा!

झाली असेल चूक जरी, या निमित्ताने तरी ती विसरा, वाटून प्रेम एकमेकांस, साजरा करु यंदाचा हा दसरा! दसऱ्याच्या शुभेच्छा!

पती-पत्नीसाठी खास शुभेच्छा

माझ्या आयुष्याच्या प्रवासात तूच माझा खरा सोन्याचा क्षण आहेस. तुझ्यामुळेच माझ्या जीवनात दररोज दसरा आहे. शुभ विजयादशमी, प्रिय!

रावणासारख्या सर्व संकटांवर मात करत, आपले प्रेम असेच विजयी राहो. हॅप्पी दसरा, माय लव्ह!

आपट्याच्या सोन्यासारखा आपला संसार फुलत राहो, हीच आई भवानीचरणी प्रार्थना. दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा, माझ्या साथीदारा!

विजयादशमीच्या या शुभमुहूर्तावर, आपल्या नात्यातील प्रेम, विश्वास आणि आपुलकी द्विगुणित होवो. माझ्या प्रिय पत्नी/पतीला दसऱ्याच्या शुभेच्छा!

तुझ्या रूपात मला आई जगदंबेचा आशीर्वाद मिळाला आहे. प्रत्येक पावलावर तुझा विजय असो. दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा!

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com