राहुल गांधी यांच्या वापसीने काॅंग्रेसला खरंच फायदा होणार का?

राहुल गांधी यांच्या वापसीने काॅंग्रेसला खरंच फायदा होणार का?

मोदी समुदयाला चोर म्हणून आपल्यावर न्यायालयीन कारवाई ओढावून घेतलेले काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांना गुजरातच्या कनिष्ठ न्यायालयाने सुनावलेल्या दोन वर्षांच्या शिक्षेला गुजरात उच्च न्यायालयाने कायम करण्याच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने दोन वर्षांची कमाल शिक्षा सुनावण्याच्या निर्णयाला स्थगिती दिल्याने काॅंग्रेस परिवारात उत्साहाचे वातावरण आहे.
Published by  :
shweta walge

सुनील शेडोळकर, ब्युरो चीफ; मोदी समुदयाला चोर म्हणून आपल्यावर न्यायालयीन कारवाई ओढावून घेतलेले काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांना गुजरातच्या कनिष्ठ न्यायालयाने सुनावलेल्या दोन वर्षांच्या शिक्षेला गुजरात उच्च न्यायालयाने कायम करण्याच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने दोन वर्षांची कमाल शिक्षा सुनावण्याच्या निर्णयाला स्थगिती दिल्याने काॅंग्रेस परिवारात उत्साहाचे वातावरण आहे. त्यामुळे गल्लीपासून दिल्लीपर्यंत काॅंग्रेस अध्यक्षांपासून ते थेट शेवटच्या कार्यकर्त्यांपर्यंत मोठ्या प्रमाणावर जल्लोष सुरू आहे. पण राहुल गांधी यांनी जे वक्तव्य मोदी समुदयाबाबत केलेले आहे त्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने तीव्र नापसंती व्यक्त केली ही बाबही विचारात घेतली पाहिजे. शिक्षा सुनावताच राहुल गांधींच्या खासदारकीवर आणि घर ताब्यात घेण्यासाठी जी तत्परता भारतीय जनता पक्षाने दाखविली ती पाहता काॅंग्रेस अध्यक्ष व कार्यकर्त्यांचा जल्लोष समजून घेण्यासारखा आहे, पण कमाल शिक्षा का दिली अशी विचारणा सर्वोच्च न्यायालयाने करत केस पुन्हा खालच्या कोर्टात पाठवून दिले आहे. याचाच अर्थ केस अजून सुरुच आहे. शिक्षा कमी होऊन पुन्हा निकाल लावला जाऊ शकतो. राहुल गांधींची निर्दोष मुक्तता झाली नाही हे वास्तव काॅंग्रेस अध्यक्ष व कार्यकर्त्यांनी समजून घेणे गरजेचे आहे. शिक्षेला स्थगिती दिल्याने राहुल गांधी यांना खासदारकी पुन्हा बहाल करण्यात यावी अशी आग्रही मागणी काॅंग्रेसच्या गटनेत्यांनी लगेच लोकसभेच्या सभापतींना पत्र देऊन केली.

राहुल गांधी यांचे संसदेत असणे काॅंग्रेससाठी प्राणवायू पुरवठा पूर्ववत सुरू होण्यासारखेच आहे. त्यामुळे आज नाही तर उद्या सत्याचा विजय होणारच होता असे काॅंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी सांगून त्यांनी राहुल गांधींना अलिंगनही दिले. पण या निर्णयामुळे स्वतः मल्लिकार्जून खरगे किती खुश आहेत हे येणारा काळच सांगेल. शिवाय ज्या राहुल गांधींवर खासदारकी व सरकारी घर गमावण्याची नामुष्की आली त्याच राहुल गांधींनी अशा प्रतिकूल परिस्थितीतही 26 विरोधी पक्षांची एकत्र मोट बांधून त्याला ' इंडिया ' हे नाव देत नरेंद्र मोदींना आव्हान देण्याचा प्रयत्न केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या व एनडीए खासदारांच्या बैठकींचे जे सत्र सुरू केले आहे ते इंडिया ला घाबरून अशी वक्तव्ये काॅंग्रेस पक्षासोबत प्रमुख विरोधी पक्षांकडून आली पण राहुल गांधींच्या शिक्षेला मिळालेल्या स्थगितीचे स्वागत संजय राऊत वगळता कुणीही केलेले नाही. संजय राऊतांनी ही करण्याचे कारण हे आहे की, ज्या शरद पवारांच्या भरवशावर संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांना भारतीय जनता पक्षासोबत पंगा घ्यायला लावत शिवसेनेत उभी फूट पाडून घेऊन कधी नव्हे एवढी वाईट स्थिती उद्धव ठाकरे यांची करून सोडली आहे. शरद पवार स्वतः साठीच नवा सहारा शोधत असताना ते शिवसेनेसाठी पुन्हा सहारा होतील याची शक्यता नसल्याने काॅंग्रेस ची री ओढणे संजय राऊत व उद्धव ठाकरे यांची अपरिहार्यता आहे. शिवाय 31 आॅगस्ट व 1सप्टेंबरला मुंबईत होणाऱ्या तिसऱ्या बैठकीचे आयोजकत्व स्वीकारुन टाचणी लागलेल्या फुग्यात भल्या मोठ्या पंपाने हवा भरण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे करीत आहेत.

राहुल गांधी यांच्या शिक्षेला स्थगिती मिळणार नाही अशा विचारानेच नितीशकुमार, ममता बॅनर्जी, अरविंद केजरीवाल व शरद पवार ' इंडिया ' मध्ये सहभागी झाले होते. परवा लोकसभेत दिल्ली विधेयक मंजूर झाल्यानंतर गृहमंत्री अमित शहा म्हणाले होते की राज्यसभेत हे विधेयक मंजूर झाल्यानंतर अरविंद केजरीवाल हे 'इंडिया' तून बाहेर पडतील. केजरीवाल व नितीशकुमार व यांना राष्ट्रीय राजकारणात येण्याची तीव्र इच्छा आहे व काॅंग्रेस ने राहुल गांधी नसल्याने पंतप्रधान पदाचा उमेदवार 2024 च्या निकालानंतर ठरविला जाईल. 1991 मध्ये राजीव गांधी यांची हत्या झाल्यानंतर पी.व्ही. नरसिंह राव यांची पंतप्रधानपदी नियुक्ती करण्यात आली होती. राहुल गांधी यांना झालेली दोन वर्षांची शिक्षा त्यांना 2024 ची लोकसभा निवडणूक लढण्यापासून दूर ठेवणार असा कयास बांधून मल्लिकार्जून खरगे हे दुसरे नरसिंह राव होऊ पाहात होते. राहुल गांधी यांच्या वापसीनंतर गांधी परिवाराशिवाय अन्य कुणाचे नाव पंतप्रधानपदाच्या शर्यतीत असूच शकत नाही हा काॅंग्रेस चा इतिहास सांगतो. नरसिंह राव ही एक अपरिहार्यता होती. पण तशी परिस्थिती आता नाही हे खरगेही जाणून आहेत. शरद पवारही राहुल गांधींच्या शिक्षेमुळेच विरोधी तंबूत आहेत असे बोलले जाते. कुणासाठी एवढा आटापिटा करायचा असा प्रश्न अजित पवार यांनी शरद पवारांना त्यांच्यापासून वेगळं होताना केला होता, त्याची प्रचिती शनिवार च्या अमित शहा यांच्या पुणे दौऱ्यावेळी आली. शरद पवारांचे दूत व त्यांच्या पक्षाचे महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी शनिवारी रात्री पुण्यात अमित शहा यांची गुप्त भेट घेतली. शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधी यांच्या शिक्षेला स्थगिती दिली आणि शनिवारी जयंत पाटील अमित शहा यांना भेटले, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांनी ही भेट घडवून आणली हे विशेष. त्याच्या चारच दिवस आधी नरेंद्र मोदी हे लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारण्यासाठी पुण्यात होते त्या कार्यक्रमाला शरद पवारांनी उपस्थित राहू नये असे काॅंग्रेस व उद्धव ठाकरे गटाचे म्हणणे होते, पण वैयक्तिक संबंध जपण्यात माहीर असलेल्या शरद पवारांनी या सूचनेकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले व वेळेआधी पंधरा मिनिटे पवार कार्यक्रम स्थळी पोहोचलो. मोदी-पवार व शहा-जयंत पाटील भेट हा योगायोग नक्कीच नाही एवढे मात्र निश्चित. पश्चिम बंगाल च्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी याही राष्ट्रीय राजकारणात येऊ पाहात आहेत. इंडिया टीममध्ये सहभागी झाल्याबद्दल व नरेंद्र मोदींना प्रखर विरोध असल्यामुळे विरोधी पक्षांची जी मोट बांधली जात आहे त्याचे निमंत्रक पद मिळावे अशी अपेक्षा त्या ठेवून आहेत. नितीशकुमार यांनी बिहार मधून कुठूनही लोकसभा लढवावी त्यांचे डिपाॅझट जप्त होणार असे भाकीत राजकारणातील रणनीतीकारांनी उघडपणे सांगितल्यानंतर नितीशकुमार उत्तरप्रदेश मधून सुरक्षित मतदारसंघ शोधत आहेत. बिहारमध्ये राजद व भाजपला दोन दोन वेळा धोका देऊन झाल्यानंतर पुन्हा मुख्यमंत्री पद मिळणार नसल्याने त्यांनी मोदी विरोध तीव्र करत राष्ट्रीय राजकारणात येण्याची खुमखुमी व्यक्त केली तर राजस्थान, मध्य प्रदेश व हरियाणा मधील विधानसभा निवडणुकांना लोकसभेची सेमीफायनल समजून काॅंग्रेस चा जनाधार घेणार दिल्ली व पंजाब ची पुनरावृत्ती करत आपण राष्ट्रीय राजकारणात येण्याची अरविंद केजरीवाल यांची खेळी होती. पण राहुल गांधी यांच्या शिक्षेला स्थगिती मिळाली अन् राहुल गांधी पुन्हा लोकसभेत येणार व त्यामुळे नरेंद्र मोदी यांच्यासमोर पंतप्रधान पदाचा चेहरा म्हणून काॅंग्रेस कडून प्रोजेक्ट केले जाणार त्यामुळे काॅंग्रेस च्या खासदारकीच्या जागा वाढीला त्याचा उपयोग करून घेण्याचा त्यांचा प्रयत्न असणार.4000 किलोमीटरची भारत जोडो यात्रा आणि दोन वर्षांच्या शिक्षेला मिळालेली स्थगिती ' इंडिया ' ला नवसंजीवनी देणार का विरोधकांच्या धोबीपछाड देत नरेंद्र मोदी 2019 ची पुनरावृत्ती करुन हॅटट्रिक साधणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे......!

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com