सत्ताकेंद्रित राजकारणातून खुंटलेला विकास
– शुभम शिंदे
राजकारणाचा भव्य वारसा असलेला आपला महाराष्ट्र. याच महाराष्ट्राने अनेक धुरंधर राजकारणी आपल्याच कुशीत वाढवले. दिल्लीवर संकटे आली की मदतीला प्रथमता: धावून जातो तो महाराष्ट्र. 1 मे 1960 ला महाराष्ट्राची निर्मिती झाली. यशवंतराव चव्हाण यांना संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होण्याचा मान मिळाला. हेच यशवंतराव चव्हाण पुढे जाऊन देशाचे पाचवे उपपंतप्रधान झाले. पुढे महाराष्ट्राच्या राजकारणात असे अनेक नेते घडले की ज्यांनी पुढे जाऊन देशाचं नेतृत्व केलं. देशाला अपेक्षित राजकारणी महाराष्ट्राच्या मातीने जन्माला घातले. सहकार, लोकशाही विकेंद्रीकरण, कृषी आणि उद्योजकता या सूत्रांवर यशवंतराव चव्हाणांनी महाराष्टाच्या विकासाची भावी वाटचाल आखली आणि त्याच पद्धतीने मुख्यमंत्री म्हणून खुर्चीला योग्य न्याय देण्याचं काम यशवंतरावांनी केलं आणि एक राज्य म्हणून महाराष्ट्राचा गाडा सुरळीत सुरु झाला.
सकारात्मक पद्धतीने सुरु झालेली महाराष्ट्राच्या राजकारणाची वाटचाल अधिक वेगवान होण्याऐवजी आणि आता एका मोठ्या टप्प्यावर पोहोचण्याऐवजी बिकट झाल्याचं पाहायला मिळतंय. महाराष्ट्राची निर्मिती होऊन सहा दशके झालीत. एवढा सगळा राजकारणाचा इतिहास आपल्या महाराष्ट्राला असताना तत्कालीन राजकारणावर नजर टाकली तर आपल्या महाराष्ट्राची राजकीय वाटचाल एखाद्या विघातक आणि खूप मोठया हानिकारक वळणावर जातेय यात तिळमात्र शंका नाही.
सत्ता हेच सर्वस्व
1980 नंतर महाराष्ट्र्रात राजकीय स्पर्धा वाढीस लागली आणि तिथून पुढे सत्ता हेच सर्वस्व हा महाराष्ट्राच्या राजकारणाचा नवा पायंडा पडला. आणि आज सद्य स्थिती पहिली तर राजकारण कोणत्या स्तरावर येऊन पोहोचलंय याचे कोणते वेगळे दाखले देण्याची गरज वाटत नाही. ते सर्व तुम्ही पाहताय, अनुभवताय आणि त्याचे परिणामही भोगताय. विकास, प्रगती आणि जनतेचं हित हाच एकमेव अजेंडा ठेऊन राज्य पुढं जाणे अपेक्षित असताना काही अनपेक्षित संस्कार आपल्या राजकारणावर होत गेले आणि त्यातून राजकीय पक्षांच्या टोकाच्या भूमिका उदयास आल्या. पक्ष-पक्ष म्हणून आधी जनता आणि नंतर सत्ता हा विचार नष्ट होऊन सत्ता हेच राजकारणाचं सर्वस्व बनलं. आणि राजकारणातील हाच नकारात्मक बदल महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला ठेच पोहोचवण्यात महत्वाचा ठरला.
पुरोगामी महाराष्ट्राला कीड
छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारसरणीवर पुढे जाणाऱ्या पुरोगामी महाराष्ट्राला 1999 नंतर कीड लागली ती महाराष्ट्रातील राजकीय पक्षांच्या अंतर्गत कलहाची आणि सत्तेच्या वर्चस्वाची आणि इथूनच सुरु झालं सत्ताकेंद्रित राजकारण. नव्व्दचे दशक शेवटपर्यंत आले आणि राजकारणात काही मोठ्या घडामोडी घडल्या. काँग्रेसचे नेते शरद पवारांनी पक्षाशी बंड केलं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जन्म झाला. आणि याच वर्षी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर एकत्र असलेल्या शिवसेना-भाजपाच्या युतीच्या सरकारचा पराभव होऊन राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीचे आघाडी सरकार आले. हेच सरकार पुढील पंधरा वर्ष राहिले. याच आघाडी सरकारच्या कार्यकाळात विरोधी पक्षही आणखी बळकट झाला. हिंदुत्वाच्या मुद्यांवर भाजप आणि शिवसेनेनेन प्रत्यक्ष राजकारणाला सुरुवात केली. याच वेळेस आघाडी सरकारमधील पक्ष देखील राजकारणासाठी धर्माचा आणि जातीचा वापर करणे हे चांगले शिकले होते. याच दहा वर्षांच्या काळात राजकारणाला तडे जाऊन धर्मकारण वाढीस लागले. संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेपासून जुळवून आलेल्या राजकीय गणितांना 90च्या दशकात छेद देण्यात आला. तोपर्यंत 'राम मंदिर' मुद्द्याचा वापर राजकारणासाठी कसा करायचा हे सुद्धा राजकारणी खूप चांगले शिकले होते. सामाजिक विषमता, जातीयता आणि धार्मिक तेढ हे इथून पुढच्या राजकारणाचे महत्वाचे अंग बनले.
2019 चा सत्तासंघर्ष आपण सर्वांनी अनुभवला. तो सविस्तर लिहिण्याची गरज नाही मात्र महाराष्ट्रातील जनतेला शासनापासून वंचित ठेवणायचं काम 2019 मध्ये राजकारण्यांनी करून दाखवले. सत्तेसाठी पक्ष काय करू शकतात हे कोणत्या मापदंडात बसणार नाही. सत्तेसाठी संघर्ष अनेक राजकीय नेत्यांच्या जीवावरही बेतलाय पण सत्तेची हाव सुटत नाही.
या सर्व राजकारणात काय झालं ?
दूषित राजकारणाच्या डोहात अडकल्याने जनतेचा विकास खुंटला. सत्ता म्हणजे राजकीय नेत्यांच्या अस्तित्वासाठी की जनतेच्या विकासासाठी हाच प्रश्न प्रत्येक नागरिकांसमोर आता आहेच. ज्या लोकप्रतिनिधींना आपण आपले अनमोल मत देऊ विधानसभेत आपले प्रश्न मांडून समस्या सोडवण्यासाठी पाठवले तेच आपले लोकप्रतिनिधी तिथे लोकशाहीच्या मंदिरात एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत वाभाडे काढताना दिसताय. आणि या सगळ्यात आपण इतके भरडले गेलोय की यातून बाहेर पडणे आता अवघड होऊन बसलंय. जनतेचा विकास हे पण राज्यकर्त्याचे काम आहे याची जाणीव नेत्यांना राहिलीय का?. विरोधकांनी साताधाऱ्यांना खेचण्याचा प्रयत्न करायचा आणि उद्या सत्ताधारी विरोधी पक्षात गेले की त्यांनीही सत्ताधाऱ्यांना खेचण्याचा प्रयत्न करायचा. हेच सुरु राहणार.
सत्ता हेच आताच्या राजकारणाचे समीकरण बनललेय. या द्वेषाच्या आणि स्वार्थाच्या राजकारणात जनतेचा विकास खुंटला हे त्रिकाल सत्य!!
– शुभम शिंदे, प्रतिनिधी, लोकशाही न्यूज