राष्ट्रवादी काँग्रेस फोडून देवेंद्र फडणवीस यांनी चूक केली का?

राष्ट्रवादी काँग्रेस फोडून देवेंद्र फडणवीस यांनी चूक केली का?

राजकारणात सत्ता महत्वाची असल्याने सर्वच राजकीय पक्षांची सत्तेकडे पाहण्याची दृष्टी जवळपास सारखीच जाणवते.
Published by  :
shweta walge

सुनील शेडोळकर; राजकारणात सत्ता महत्वाची असल्याने सर्वच राजकीय पक्षांची सत्तेकडे पाहण्याची दृष्टी जवळपास सारखीच जाणवते. विरोधी पक्षातूनही लोकांचे प्रश्न सोडवता येतात एवढ्या ताकदीचे विरोधी पक्षनेतेही महाराष्ट्राच्या विधिमंडळाने पाहिले आहेत. सत्तेत येण्यासाठी नीती - अनीती कोणतेही मार्ग अवलंबिण्याची राजकीय पक्षांची अगतिकता संसदीय व लोकशाही मूल्यांचे महत्त्व कमी करणारे आहे. काॅंग्रेस राजवटीत विरोधी विचारांचे सरकार पाडण्यासाठी कलम 356 चा वापर करून राष्ट्रपती राजवट लागू करून लोकमताचा अनादर करण्याचे प्रकार अनेक वेळा घडलेले आहेत. अशा प्रत्येक घटनेने विरोधी विचारांना अधिक बळकटी मिळाल्याची अनेक उदाहरणेही भारतीय राजकारणात सांगता येतील. आंध्र प्रदेशात एन. टी. रामाराव यांचे लोकनियुक्त सरकार केवळ वैचारिक बेबनावामुळे इंदिरा गांधींनी बरखास्त केल्यानंतर विरोधी पक्षांनी दिल्ली हलवून सोडली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर एन.टी. रामाराव यांना पुन्हा सत्ता बहाल करण्यात आल्याने लोकशाही मूल्यांची जपवणूक केली गेली. म्हणूनच भारतीय राजकारणाला सत्ताधाऱ्यांवर अंकुश ठेवण्यासाठी विरोधाची धार अनिवार्य ठरत आलेली आहे. देशाचे राजकारण जसे बदलत जाते तसे राजकारणीही बदलताना दिसतात आणि यातून फोडाफोडीचे राजकारण जन्माला आले.‌ आपला पक्ष बळकट करण्यासाठी पूर्वी विरोधकांच्या पक्षात नाराज गट शोधायचा आणि तो आपल्याकडे वळवून सरकारवरील संकट दूर करण्याचे राजकारण यानिमित्ताने सुरू झाले. महाराष्ट्रात अशा राजकारणाला शरद पवारांनी अतिशय चपखलपणे वापरले असे म्हणता येईल. निरनिराळी अमिषे व कामांना झुकते माप देण्याच्या बदल्यात हे सर्व केले जायचे. शरद पवारांनी अशा प्रकारच्या राजकारणाला महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात चालना दिली. विरोधकांना राजकीय जखम करायची पण त्यांची खपली न काढण्याची शालिनताही जपण्याचे मर्म शरद पवार जाणून असत. त्यामुळेच राजकीय स्पर्धेतील आपले कट्टर विरोधक असलेले शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हयातीत शरद पवारांनी शिवसेना दोन वेळा फोडली. बाळासाहेब व शरद पवार एकमेकांचे राजकीय विरोधक असल्याने एकमेकांवर तुटून पडायचे. छगन भुजबळ, नारायण राणे, गणेश नाईक या शिवसेनेतील बिनीच्या शिलेदारांना फोडून शरद पवारांनी आपले राजकीय इप्सित साध्य केले पण बाळासाहेबांसोबतचा व्यक्तिगत नात्यांचा जिव्हाळा कधी तुटू दिला नाही. दोन वेळा शिवसेना फोडणाऱ्या शरद पवारांसमोर बाळासाहेब ठाकरेंनी पुन्हा शिवसेना नव्याने उभारली आणि राजकारणाची परतफेड व्याजासकट केली. 1995 ची लोकसभा आणि विधानसभा जिंकतानाची बाळासाहेबांची शरद पवारांविरोधातील आग ओकणारी जहाल भाषा पवारांना सत्तेतून खाली खेचणारी ठरली असली तरी सुप्रिया सुळे या शरद पवारांच्या कन्या पहिल्यांदाच लोकसभा निवडणूक लढवताना सुप्रिया सुळे यांच्या विरोधात उमेदवार उभा न करता राजकीय दातृत्व बाळासाहेबांनी दाखविले. आज ते नेतृत्व आणि दातृत्व महाराष्ट्राच्याच काय देशाच्या राजकारणातून बाद होतांना दिसत आहे.

2014 मध्ये नरेंद्र मोदी यांनी देशाचे पंतप्रधान झाले. एका राज्याचा मुख्यमंत्री असलेली व्यक्ती देशाचा पंतप्रधान झाल्याने राज्यांच्या असणाऱ्या अडचणी केंद्राला समजण्याचा मार्ग सुकर होईल अशी अपेक्षा वाढलेली होती. यापूर्वी देवेगौडा यांना अशी संधी मिळाली होती पण वर्षभरातच त्यांचे सरकार कोसळल्याने राज्याच्या अडचणी केंद्राने समजण्याचा विषय अर्धवट राहिला. देवेगौडांची राजकीय मर्यादा नरेंद्र मोदींनी ओलांडून पूर्ण बहुमत मिळवले असल्याने त्यांच्याकडून अपेक्षा वाढल्या होत्या, पण विरोधकांची सरकारे बरखास्त करण्याचे काॅंग्रेस चे पातक मोदींनी नव्या शैलीत स्वीकारल्याचे 2019 नंतर जाणवू लागले. ईडी, सीबीआय व इनकम टॅक्स या देशातील प्रभावी यंत्रणेतील मोठ्या हुद्द्यावरील अधिकाऱ्यांना स्वेच्छानिवृत्ती घ्यायला लावून त्यांना भारतीय जनता पक्षाच्या कोअर टीमशी जोडण्यात आले. या सर्व अधिकाऱ्यांना आपापल्या विभागाची असलेल्या सखोल माहितीचा उपयोग करून घेण्याचे ठरवत. या अधिकाऱ्यांच्या समन्वयातून विरोधी विचारांच्या नेत्यांचे कच्चे दुवे हेरून त्यांना जखडण्याची योजना बनवली व ती पद्धतशीरपणे राबवली. राजकारणी म्हटल्यावर कुणी धुतल्या तांदळाचे नसतात तरी या कच्च्या दुव्यांना कायद्याच्या चौकटीत बसवून नेम लावत अनेक सावज टिपले. आॅपरेशन कमळ चा मोह जर भारतीय जनता पक्षाने व नरेंद्र मोदींनी टाळला असता तर ईडी, सीबीआय व इनकम टॅक्स या यंत्रणांकडून जे मोहरे हाती लागले होते त्यांच्यावरील कारवाई ही नरेंद्र मोदींसाठी 2024 ची नांदी ठरली असती. यंत्रणांचा फास इतका अचुक आवळला होता त्यामुळे सामान्य मतदारांना सरकार काय करु शकते याची अनुभूती आली असती. 2017 च्या पश्चिम बंगाल मधील विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांना वेसण घालण्यात अपयश आल्यानंतर लगेच भारतीय जनता पक्षाने 360 अंशात राजकारणाची दिशा बदलण्याचे ठरविले. मुळात त्याची काहीच गरज नव्हती, पण सत्ता ज्या वेळी माणसाच्या बेचैनीची ओळख बनते त्या वेळी चुकीचे निर्णय घेण्यास भाग पाडते. कर्नाटक मधील आॅपरेशन ने भाजपला सत्तेची भूक वाढीला लागली, नंतर मध्य प्रदेश हाती लागले. 2019 मध्ये महाराष्ट्रात शिवसेनेने अनपेक्षितपणे भारतीय जनता पक्षाची नांगी ठेचून अस्थिर राजकारणातील नवा अध्याय लिहिण्याचा धोका पत्करला. देवेंद्र फडणवीस या महत्वाकांक्षी मुख्यमंत्र्यांला खड्यासारखे बाजुला करण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या मदतीला शरद पवार आले आणि जे अशक्य होते ते शक्य झाले.‌ महाराष्ट्र गमावल्यानंतर भारतीय जनता पक्षाची अगतिकता नजरेत भरणारी दिसू लागली. उद्धव ठाकरे यांचा अननुभव, कोविडचा उद्रेक आणि सत्तेतील वापसी देवेंद्र फडणवीसांना अस्वस्थ करणारी होती. राज्यसभा व विधान परिषदेच्या निवडणुकांचे टायमिंग साधून शिवसेनेत आजवरची सर्वात मोठी फूट पाडून उद्धव ठाकरे यांचे सरकार उलथवून टाकले. देवेंद्र फडणवीस यांना सत्तेबाहेर ठेवण्याची रणनीती राबवणारे शरद पवार यांना गरज नसताना भाजपने रडारवर घेतले. देवेंद्र फडणवीसांचे राजकारण भविष्यात शरद पवारांना अडचणीचे ठरणारे होते म्हणूनच शरद पवार यांनी त्यांना पुन्हा सत्तेत येण्यापासून रोखले होते. हे खरे जरी असले तरी एकनाथ शिंदेंसोबत सरकार स्थापन केल्यावर शरद पवारांना डिवचणे भाजपला महागात पडतंय असं आजचं चित्र बघून म्हणता येईल. ज्या शरद पवारांनी राज्यात वसंतदादा पाटलांपासून भल्याभल्यांना घाम फोडला आहे त्या शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस फोडून अजित पवारांनाही सत्तेत घेतल्याची सल शरद पवारांना अस्वस्थ करणारी होती. देवेंद्र फडणवीस यांचा राजकीय हिशेबाची वाट बघत नसतील तर ते पवार कसले. आंतरवली सराटी या जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील एका गावाने शरद पवारांनी संधी मिळाली. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनास बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर पोलिसांचा लाठीचार्ज शरद पवारांना सकाळी सकाळीच आंतरवली सराटीत घेऊन गेला. शरद पवारांचे तेथून दोन्ही शाहू महाराजांना गेलेले फोन आंदोलनाची दिशा बदलणारे ठरले. छगन भुजबळ आज जे बोलत आहेत त्याचीही स्क्रिप्ट भुजबळांची असेल याबाबत शंका आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडणे देवेंद्र फडणवीसांना महागात पडणार असे दिसत आहे. नागपूर या आपल्या घरच्या मतदारसंघांतून 2024 च्या विधानसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस पराभूत झाल्यास नवल वाटायला नको इतक्या दूरपर्यंत हा राजकीय हिशेब जाऊ शकतो. बघूया, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडून शरद पवारांपासून 40 आमदार फोडणाऱ्या देवेंद्र फडणवीसांसाठी शरद पवारांनी पायाने मारलेली ही गाठ देवेंद्र फडणवीस अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या सहा हातांनी ती गाठ कशी सोडवतात? यालाच म्हणतात राजकारण.....!

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com