G20मधून काॅंग्रेसला एकटे पाडण्याचा प्रयत्न करताहेत का मोदी?

G20मधून काॅंग्रेसला एकटे पाडण्याचा प्रयत्न करताहेत का मोदी?

ग्रुप 20 म्हणून 1999 पासून जागतिक स्तरावरील हा समूह म्हणजेच G 20.
Published by :
Siddhi Naringrekar

सुनील शेडोळकर

ग्रुप 20 म्हणून 1999 पासून जागतिक स्तरावरील हा समूह म्हणजेच G 20. यंदाचे यजमानपद भारताकडे असल्याने 9 व 10 सप्टेंबर या दोन दिवसांसाठी नवी दिल्लीला आंतरराष्ट्रीय व्यासपीठ मिळाले व जवळपास 40 देशांचे प्रमुख या सोहळ्यात सहभागी झाले होते. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या सोहळ्याची सुरुवात गेल्या वर्षी इंडोनेशियातील बाली येथील G 20 बैठकीत पुढील वर्षीचे यजमानपद भारताकडे असण्याच्या घोषणेपासूनच सुरू केली असावी असे मोदींचा या दोन दिवसांतील वावर पाहता स्पष्टपणे जाणवत होते. जगातील एकूण जीडीपीच्या 85 टक्के व एकूण जागतिक व्यापाराच्या 75 टक्के क्षेत्र हे G 20 मधील सदस्य देशांनी व्यापलेले असल्याने आंतरराष्ट्रीय पातळीवरील व्यापाराच्या नव्या संधी शोधत अमेरिका, ब्रिटन, जपान, चीन, इटली, माॅरिशस, बांगलादेश, तुर्कस्तान, दुबई, युएई सह अन्य महत्त्वपूर्ण देशांतील प्रमुख या सोहळ्यात सहभागी झाले होते. भारतातर्फे अत्यंत देखणी बडदास्त या विदेशी पाहुण्यांची ठेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक पातळीवर आपल्या नेतृत्वाचा डंका पुन्हा एकदा वाजविण्यात यश मिळविले. भारतासाठी ही खूप मोठी संधी असून त्याचे दूरगामी सुपरिणाम दिसणार आहेत. G 20 ची व्याप्ती भविष्यात G 200 असावी असा मोदींचा मानस आहे. आजवर 18 देशांत G 20 चे आयोजन झाले आहे, पण भारतातील हे आयोजन सर्वात मोठे ठरले. यामुळेच अमेरिका भारताकडे चीनची प्रभावी रिप्लेसमेंट म्हणून बघत आहे.

भारताची वाढत जाणारी अर्थव्यवस्था, संरक्षण, टेक्नॉलॉजी, जैवइंधनातील संधी नव्याने खुणावत आहेत. गेल्या वर्षीच अमेरिकेच्या ज्यो बायडन यांनी नरेंद्र मोदींना व्हाईट हाऊस मध्ये लाल गालिचे अंथरले होते, G 20 मध्ये मोदी यांनीही अमेरिकेच्या राष्ट्रपतींना नवी दिल्लीत आपल्या निवासस्थानी लाल गालिचा अंथरुन सर्वोच्च आदरातिथ्य केले आहे. त्यामुळेच बायडन हे प्रभावीत झाले असून चीनची सर्वोत्तम रिप्लेसमेंट म्हणून भारताकडे ते पाहात आहेत. त्याच उद्देशाने त्यांनी अमेरिकेचा भला मोठा लवाजमा सोबत आणला आहे. 19 विमाने, 60 गाड्यांचा ताफा व 150 पत्रकार एवढ्या मोठ्या ताफ्याने बायडन आले याचा अर्थ भारताबद्दल त्यांना मोठ्या व्यापाराच्या अपेक्षा दिसतात. ब्रिटन चे पंतप्रधान ऋषी सुनक हे भारतीय वंशाचे व खरगपूर आय आय टी चे विद्यार्थी असलेले आणि इन्फोसिस चे नारायण मूर्ती व सुधा मूर्ती यांचे जावई आहेत, आपली पत्नी अक्षता मूर्ती सोबत ते उपस्थित राहिले. ब्रिटन मधून खलिस्तानी आतंक मुळापासून उखडून टाकला जाईल अशी ग्वाही त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिली, भारतासाठी ते आशादायक चित्र आहे. ब्रिटन ची अर्थव्यवस्था सध्या डबघाईस आलेली असून त्यातून ब्रिटनला बाहेर काढण्यासाठी भारताच्या मदतीची अपेक्षा ऋषी सुनक ठेवून आहेत. नवी दिल्लीतील या G 20 परिषदेतला जगभरातून दीड लाख विदेशी पाहुणे आलेले आहेत. भारताच्या राष्ट्रपतींनी 40 देशांच्या प्रमुखांसह भारतातील आघाडीचे उद्योगपती, सिने तारका, सर्व राज्यांचे मुख्यमंत्री, माजी पंतप्रधान अशा 500 पेक्षा जास्त पाहुण्यांसाठी डिनर आयोजित केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखालील या परिषदेत आफ्रिकन युनियनला कायम सदस्य म्हणून सामावून घेत यापुढील परिषद ही G 21 असेल अशी घोषणा मोदींनी केली. आफ्रिकन समूहामुळे 55 आफ्रिकन देश या परिषदेशी जोडले गेले आहेत.

एवढे भव्य आयोजन करण्यात आले असले तरी या सोहळ्यापासून सोनिया गांधी, राहुल गांधी व काॅंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना दूर ठेवत यात राजकारण आणण्याची खेळी नरेंद्र मोदींनी साधली. कुठल्याही राजकीय पक्षांना या परिषदेत जागा देण्यात आली नव्हती त्यामुळे राजदचे लालूप्रसाद यादव, नॅशनल काॅनफरन्स चे फारुक अब्दुल्ला व उमर अब्दुल्ला, पीडीपीच्या महेबूबा मुफ्ती, राष्ट्रवादी काँग्रेस चे शरद पवार, शिवसेनेचेच उद्धव ठाकरे व भारतीय जनता पक्षाचे जे.पी. नड्डा यांना जाणीवपूर्वक दूर ठेवण्यात आले. मल्लिकार्जुन खरगे यांना न बोलावल्यामुळे राहुल गांधी यांनी थेट युरोपातील बेल्जियम मध्ये जाऊन मोदी विरोधी पक्षांना संपवू पाहात असल्याचा आरोप केला. पण स्वतः च्या राष्ट्रीय अध्यक्षांनाच न बोलावून नरेंद्र मोदींनी अन्य पक्षांपर्यत योग्य तो निरोप पोहोचविला आहे. मल्लिकार्जुन खरगे राज्यसभेत विरोधी पक्षनेते असल्याने त्यांना बोलावणे अपेक्षित होते, पण काॅंग्रेस च्या मुख्यमंत्र्यांना निमंत्रित करुनही ते येऊ नयेत यासाठीच मल्लिकार्जुन खरगे यांना निमंत्रण न पाठवून आपले इप्सित साध्य केले. चार राज्यांतील काॅंग्रेस च्या मुख्यमंत्र्यांना बोलावले होते पण हायकमांडच्या संस्कृती मुळे ते या डिनर डिप्लोमसीला पोहोचले नाहीत. द्रमुक चे मंत्री व एम.के. स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी यांनी सनातन विरोधात केलेल्या वक्तव्यावर खरगेंचे पुत्र प्रियांक खरगे यांनीही सनातन विरोधात बोलल्याचे निमित्त साधून मल्लिकार्जुन खरगे यांना बोलावणे टाळले पण तमिळनाडू चे मुख्यमंत्री असलेले एम.के. स्टॅलिन यांना मात्र राष्ट्रपती भवनात भोजनासाठी आमंत्रण दिले व ते उपस्थित राहिलेही. G 20 पासून काॅंग्रेस ला एकटे पाडण्याचा हा जाणून बुजून केलेला हा प्रयत्न होता. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनाही मोदींनी स्वतः च्या घरी उतरवून राहुल गांधी यांची भेट होणार नाही याचीही काळजी घेतली गेली. राहुल गांधी हे एरवी कुठल्याही दलित कार्यकर्त्याच्या घरी जेवायला जातात व त्याचे फोटो समाज माध्यमावर टाकतात. 9 व 10 सप्टेंबर रोजी नवी दिल्लीत अशी गांधीगिरी करण्याची संधी राहुल गांधी यांनी दवडली. ते थेट बेल्जियम मध्ये जाऊन मोदींविरोंधात वक्तव्य केले. काॅंग्रेस च्या झेंड्याखाली सर्व विरोधकांना राहुल गांधी यांनी एकत्र करून इंडिया आघाडी स्थापन करून 2024 साठी नरेंद्र मोदींसमोर आव्हान उभे करण्याचा प्रयत्न केला आहे.

विरोधकांच्या आघाडीत फूट पाडण्याचा मोदींकडून प्रयत्न केला जाणार असे भाकीत मुंबईत झालेल्या इंडिया आघाडीच्या तिसऱ्या बैठकीत व्यक्त करण्यात आले होते आणि G 20 मध्ये ममता बॅनर्जी, अरविंद केजरीवाल, नितीशकुमार यांना निमंत्रित करुन मोदींनी ते खरे करून दाखवले. मोदी लढवीत असलेली शक्कल बऱ्याचदा विरोधकांना बुचकळ्यात पाडणारी असते. ज्या वन नेशन वन इलेक्शन च्या समितीत काॅंग्रेस चे लोकसभेतील नेते अधिररंजन चौधरी यांना मल्लिकार्जुन खरगे यांची संसदेतील वरिष्ठता डावलून घेतले, त्या अधिररंजन यांना मात्र राष्ट्रपती भवनापासून रोखण्यात आले त्यामुळे काॅंग्रेस ला एकटे पाडण्याचे पूर्ण नियोजन करुनच त्याची अंमलबजावणी सुरू आहे. G 20 ही त्याचे ट्रेलर होते, खरा सिनेमा 18 ते 22 सप्टेंबर दरम्यान संसदेच्या विशेष अधिवेशनात दिसू शकतो. वन नेशन वन इलेक्शन साठी हे विशेष अधिवेशन असल्याचे सांगितले जात असले तरी काॅंग्रेस ला अडचणीत आणणारी किंवा अन्य प्रादेशिक पक्षांना सोबत ठेवण्यात काॅंग्रेस पक्षाची अडचण करण्याची कूटनीती भारतीय जनता पक्ष करु शकतो, कारण 2024 साठी इंडिया आघाडी ला लोकांचा पाठिंबा मिळू नये यासाठी प्रादेशिक पक्षांना गोंजारण्याचे प्रयत्न भाजपकडून सुरू आहेत. कर्नाटकातील लोकसभेसाठी जागावाटपाचे सूत्र बोलके आहे. जेडीएस बरोबर विधानसभा निवडणुकीत जागावाटपासाठी आडमुठेपणा करणारा भाजप विधानसभा हातची जाताच जेडीएस साठी लोकसभेसाठी 4 जागा सोडण्यास तयार झाला. काॅंग्रेस ला जसे प्रादेशिक पक्षांबाबत कटुता नाही तशीच भूमिका भाजपची झालेली दिसते. म्हणूनच 26 पक्षांची मोट बांधणाऱ्या काॅंग्रेस च्या इंडिया आघाडी समोर एनडीएने 38 पक्षांची मोट बांधून आव्हान उभारले आहे. बघूयात नरेंद्र मोदी समोर 2024 साठी एकटी पाडली जाणारी काॅंग्रेस कसे कमबॅक करते. काॅंग्रेस ला सोबत ठेवणे अन्य विरोधकांनाही आवश्यकच आहे, जी 20 व संसदेचे विशेष अधिवेशन नरेंद्र मोदींना तिसरी संधी देणारा मार्ग दाखवते का शायनिंग इंडिया ची पुनरावृत्ती घडते..... चित्र स्पष्ट होईलच, थोडी वाट पाहावी लागेल...!

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com